Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 08:57 IST2025-11-17T08:54:25+5:302025-11-17T08:57:04+5:30
Maharashtra accident statistics: महाराष्ट्रात गेल्या नऊ महिन्यात १० हजाराहून अधिक लोकांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे.

Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
मुंबई: राज्यभरात जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत १० हजार ७२० रस्ते अपघात झाले. यात ११ हजार ५३२ जणांचा मृत्यू झाला. अपघातांच्या सर्वाधिक घटना मुंबईमध्ये झाल्या, तर पुणे ग्रामीण भागात सर्वाधिक जणांचा मृत्यू झाल्याचे परिवहन विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.
राजधानी मुंबईत अपघातांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. २०२४ च्या जानेवारी सप्टेंबर कालावधीच्या तुलनेत २०२५ मध्ये अपघातांची संख्या वाढली आहे. मुंबईमध्ये नऊ महिन्यांत १ हजार ८७८ अपघात आणि २६२ मृत्यू नोंदविले गेले, तर राज्यातील सर्वाधिक अपघातात मृत्यूंची नोंद पुणे ग्रामीण झाली असून, मृतांची संख्या ७६४ इतकी आहे.
मुंबई पुणे महामार्गावरील वाहनांचा वेग कमी करण्यासाठी, कॅमेऱ्यांसह इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम स्थापित करण्यात आली. परंतु समृद्धी महामार्गावर मात्र कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच सुरक्षा उपाययोजनांमध्ये उणिवा राहिल्याचे या आकडेवारीतून समोर येते. मुंबईसारख्या घनदाट वाहतूक असलेल्या शहरात अपघातांची वाढ किती गंभीर आहे हे दिसून येते.
कुठे घट अन् कुठे वाढ?
जानेवारी ते सप्टेंबर २०२४ या गेल्या वर्षीच्या तुलनेत याच कालावधीत चालू वर्षांमध्ये समृद्धी महामार्गावरील मृतांमध्ये १६ टक्के वाढ झाली आहे. तर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर २९ टक्के घट झाली आहे.