नद्यांचा विळखा सैल; काठावरील गावांना दिलासा, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पूर्ववत, पंढरपूरचा वेढा सैल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 06:49 IST2025-08-24T06:48:23+5:302025-08-24T06:49:22+5:30
Road Transport News: गेल्या चार दिवसांपासून राज्यातील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने निर्माण झालेली पूरस्थिती आता कमी झाली आहे. धरणातून विसर्ग कमी केल्याने नद्यांमधील पाणी पातळी कमी झाली असून, पुराच्या विळख्यातून नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.

नद्यांचा विळखा सैल; काठावरील गावांना दिलासा, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पूर्ववत, पंढरपूरचा वेढा सैल
सोलापूर/ कोल्हापूर - गेल्या चार दिवसांपासून राज्यातील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने निर्माण झालेली पूरस्थिती आता कमी झाली आहे. धरणातून विसर्ग कमी केल्याने नद्यांमधील पाणी पातळी कमी झाली असून, पुराच्या विळख्यातून नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, पंढरपूर या प्रमुख शहरांचा समावेश आहे.
भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या परिसरात पाणी शेतात आणि घरात शिरल्यामुळे भीतीचे वातावरण होते. मात्र, धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग ४५ हजार क्युसेकवर आल्यानंतर हळूहळू पूर ओसरू लागला आहे. भीमा नदीवरील आठ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, गोपाळपूर, कौठाळी, नांदुरे-नेवरे पूल, पंढरपूर-तिऱ्हेमार्गे सोलापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. पंढरपूर शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, संत पेठ येथील काही सखल भागामध्ये पुराचे पाणी शिरल्याने ७०० पेक्षा जास्त कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते.
नाशिकमध्ये पुन्हा पाऊस
नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात शनिवारी पावसाने हजेरी लावली. मात्र, कालपासून अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून गोदावरी नदीत सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.
काेल्हापूर जिल्ह्यात ४१ मार्ग अद्याप पाण्याखालीच
काेल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर उघडीप राहिली, धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. परिणामी, पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी ३९ फुटांपर्यंत खाली आली आहे. अद्याप ४१ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत आहे.
पण कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावरील व कोल्हापूर ते शिये मार्गावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. कोयना धरणातून विसर्ग कमी केल्याने कालपासून कृष्णेच्या पुरामध्ये घट झाली असून, कृष्णेच्या पुराचा सांगली शहराला पडलेला वेढा सैल झाला आहे.