मच्छिमार बांधवांना दिलासा! डिझेल अनुदान थकबाकी वितरणाचे आदेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 22:40 IST2022-10-21T22:40:14+5:302022-10-21T22:40:59+5:30
गेल्या काही काळापासून हे अनुदान थकले होते

मच्छिमार बांधवांना दिलासा! डिझेल अनुदान थकबाकी वितरणाचे आदेश जारी
मुंबई: मच्छिमार सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांना नावेच्या डिझेल वर देण्यात येणाऱ्या अनुदानाची थकबाकीची रक्कम वितरित करण्याचे आदेश शासनाने शुक्रवारी जारी केले. मत्स्यव्यवसाय, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भातील सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय जाहीर केला.
मच्छिमार सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांना त्यांच्या नावेकरता लागणाऱ्या डिझेलवरील कराची प्रतिपूर्ती अनुदानस्वरूपात केली जाते. मात्र गेल्या काही काळापासून हे अनुदान थकित असल्याबद्दल काही निवेदने मंत्री मुनगंटीवार यांना प्राप्त झाली होती. त्यावर कारवाई सुधीर मुनगंटीवार यांनी विभागाला अनुदानाची थकबाकी लवकरात लवकर वितरित करावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज शासनादेश जारी करण्यात आला असून थकबाकीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. या अनुदानापोटी १८.३७ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर या थकित निधीचे वितरण करण्यात येणार आहे. ऐन दीपावलीच्या दिवसात थकबाकीच्या वितरणाचे आदेश जारी झाल्यामुळे मच्छिमार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.