मुंबई - राजापूरमधील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या ५ डझन हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल १ लाख ८ हजारांचा विक्रमी भाव मिळाला आहे. कोकणातील हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी 'ग्लोबल कोकण' आणि 'मायको' या देशातील पहिल्याच मँगोटेक प्लॅटफॉर्मद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे. कोकणातील १० आंबा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या आंबा पेटींचा लिलावाचा कार्यक्रम ५ मार्च रोजी अंधेरीतील मॅरिएट येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारी 'मायको' ब्रँडची पहिली पेटी उद्योजक आणि सेंट अग्नेलो व्हीएनसीटी व्हेंचरच्या राजेश अथायडे यांनी १ लाख ८ हजार रुपये अशी विक्रमी किंमत देऊन घेतली. 

हापूस आंब्याच्या पेटीला इतकी किंमत गेल्या शंभर वर्षात मिळाली नव्हती. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे. ''ही रक्कम म्हणजे शेतकऱ्यांनी केलेल्या प्रचंड परिश्रमांचा एक सन्मान आहे. कोकणातील आंबा बागायतदारासांठी बनवण्यात आलेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या निर्मितीसाठी मी मायको टीमचे अभिनंदन करतो'' असा आनंद राजेश अथायडे यांनी व्यक्त केला. राज्याचे विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चार शेतकऱ्यांच्या मुहूर्ताच्या पेट्या प्रत्येकी २५ हजार रुपये दर देऊन विकत घेतल्या. राजेश अथायडे यांनीच दुसरी पेटी २६ हजार, रमेश भाई यांनी २५ हजारमध्ये, सिंधुदुर्ग फार्मर प्रोड्युसरचे प्रसाद मालपेकर यांनी १५ हजारमध्ये, बांधकाम व्यावसायिक जगन्नाथ मोरे, आर्किटेक गणेश यादव, क्रिकेट कोच निलेश भोसले यांनी प्रत्येकी १२ हजारात पेटी विकत घेतल्या. लिलावात एकूण तीन लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ३१ हजार रुपये प्रमाणे ही रक्कम समप्रमाणात दिली जाणार आहे. 

राजश्री यादवराव, सुप्रिया मराठे आणि सुनैना रावराणे या तीन महिला उद्योजकांनी एकत्र येत कोकणातील परिश्रमी १०० शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी पिकवलेल्या हापूसचा ब्रँड बाजारात आणण्यासाठी 'MyKo' या मँगोटेक प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या पिकवलेला शेतातील अस्सल हापूस आंबा ग्राहकांना थेट घरपोच मिळणार आहे. प्रत्येक पेटीवर असणार्‍या विशेष क्यूआर कोडद्वारे ग्राहकांना या आंब्याची लागवड कोणत्या शेतात आणि कधी करण्यात आली, शेतकर्‍याने कसे परिश्रम घेतले, त्याची बाग याची संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे पाहता येईल. 'शेतकऱ्यांचे मनोबल वाढवत त्यांना त्यांच्या परिश्रमाचा योग्य मोबदला देण्यासाठी मायकोचा जो हायटेक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे'' असं प्रविण दरेकर यावेळी म्हणाले.

''प्रचंड परिश्रमाने कोकणातील हापूस आंब्यांची लागवड केली जाते. पण जेव्हा या आंब्यांच्या पेटीचा लिलाव करण्यात येतो त्यावेळी शेतकऱ्यांना योग्य तो भाव न मिळाल्याने त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्याला प्रतिष्ठा देणारा आणि त्यांच्या परिश्रमांचा सन्मान करणारा मायको हा विशेष उपक्रम आहे. या माध्यमातून विजयदुर्ग, राजापूर, देवगड, रत्नागिरी आणि कोकणच्या इतर भागातील सर्वोत्कृष्ट दर्जाचा आणि  कोणतीही भेसळ नसलेला आंबा जगभरातील ग्राहकांना मिळणार आहे." असे 'ग्लोबल कोकण'चे संचालक संजय यादवराव म्हणाले. ''विशेष 'मॅंगो ट्रॅव्हल फेस्ट'चे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. या फेस्टच्या माध्यमातून पर्यटकांना खरा हापूस आंबा कसा पिकतो, त्याच्या लागवडीसाठी कशी मेहनत केली जाते याचा प्रत्यक्ष शेतात अनुभव घेता येईल. 

आंब्याचा आस्वाद घेण्यापासून ते तोडण्यापर्यंतचा आनंद या फेस्टच्या माध्यमातून प्रत्येकाला घेता येईल. या फेस्टचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १० मार्च रोजी होणार आहे.'' असेही ते पुढे म्हणाले. ''गेल्या वर्षी कोरोनामुळे बाजारपेठ बंद झाली असतानाही शेतकरी थांबला नाही. उलट त्यांनी ग्राहकांना आंब्यांची थेट विक्री केल्याने नेहमीपेक्षा दुप्पट भाव मिळाला. शेतकऱ्यांच्या अथिक परिश्रमांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मायको या ग्लोबल स्तरावरील मँगो टेक प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली. यामुळे कोकणातील जीआय टॅग हापूस जगभरातील आंबा प्रेमींना थेट घरपोच सहज उपलब्ध होईल,'' असे 'Myko foods' च्या सह-संस्थापक सुप्रिया मराठे म्हणाल्या. 


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A record price of Rs 1 lakh for 5 dozen boxes of alphonso mango

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.