"प्राचीन मठ आणि मंदिरं पाडून विकास नको; पंढरपूर कॉरिडॉर विरोधात सुब्रमण्यम स्वामींचे CM फडणवीसांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 12:33 IST2026-02-15T12:28:35+5:302026-02-15T12:33:56+5:30
पंढरपूर मंदिर कॉरिडॉरचा पुनर्विचार करा यासाठी डॉ. सुब्रमण्यम स्वामींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

"प्राचीन मठ आणि मंदिरं पाडून विकास नको; पंढरपूर कॉरिडॉर विरोधात सुब्रमण्यम स्वामींचे CM फडणवीसांना पत्र
Subramanian Swamy Pandharpur Corridor:पंढरपूर हे केवळ शहर नसून ते भूवैकुंठ आहे, तिथला प्राचीन वारसा नष्ट करून कॉरिडॉर उभारणे म्हणजे वारकरी संप्रदायाचा अपमान आणि पैशांचा अपव्यय आहे, अशा कडक शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून प्रस्तावित पंढरपूर मंदिर कॉरिडॉर प्रकल्पावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. सुब्रमण्यम स्वामी हे गेल्या काही काळापासून सरकारवर हिंदूंच्या मंदिरांच्या सरकारीकरणाचा आरोप करत आहेत. सरकारने हे पवित्र तीर्थक्षेत्र कॉरिडॉर करून पर्यटनस्थळ बनवू नये अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी सातत्याने करत आहेत.
प्राचीन मठ-मंदिरे पाडून विकास नको!
डॉ. स्वामी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, वाराणसी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपुरात कॉरिडॉर बनवण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार आहे. मात्र, यासाठी मंदिराच्या १०० मीटर परिघातील ७०० हून अधिक मालमत्ता, प्राचीन मठ, मंदिरे आणि घरे पाडण्याचे नियोजन आहे. हे पाऊल आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा नष्ट करणारे ठरेल.
पत्रात काय म्हटलं?
पंढरपुरात वारकरी अनेक पिढ्यांपासून ठराविक घरांमध्ये (मठ/वाडे) मुक्कामाला येतात. ही 'यजमान कृत्य' पद्धत मोडीत काढून तिथे शॉपिंग सेंटर्स किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारणे हा विरोधाभास आहे, असं स्वामींनी म्हटलं. तीर्थक्षेत्रातील मोकळ्या जागांवर आणि वारकऱ्यांसाठी राखीव असलेल्या जमिनींवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण काढण्याऐवजी सरकार जुनी आणि कायदेशीर बांधकामे पाडत असल्याचा आरोप स्वामींनी केला आहे.
पंढरपुरात आधीच १००० हून अधिक मठ आणि धर्मशाळा आहेत. तसेच मंदिर समितीचे स्वतःचे यात्री निवास आहेत. त्यामुळे नवीन यात्री निवास बांधण्यासाठी ऐतिहासिक वास्तू पाडण्याची गरज नाही. स्वामींनी पत्रात नमूद केले की, पंढरपुरात देशातील सर्वाधिक सुलभ संकुल आहेत, परंतु त्यांची देखभाल नीट होत नाही. नवीन कॉरिडॉर बांधण्यापेक्षा आहे त्या सुविधांची दुरुस्ती करणे अधिक हिताचे ठरेल.
चंद्रभागेच्या पलीकडे कॉरिडॉर उभारावा
डॉ. स्वामी यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवले आहे की, जर कॉरिडॉर उभारायचाच असेल, तर तो चंद्रभागा नदीच्या पलीकडच्या तीरावर जिथे मोकळी जागा उपलब्ध आहे, तिथे उभारावा. यामुळे शहराचा विस्तार होईल आणि जुन्या पंढरपूरचा ऐतिहासिक वारसाही जपला जाईल.
वारकरी संप्रदायाचा आवाज
"वारकरी संप्रदायासाठी पंढरपूरची माती ही पवित्र आहे. येथील प्राचीन वास्तू पाडून भजन-कीर्तनासाठी नवीन मंडप उभारणे हास्यास्पद आहे, कारण भक्ती संकीर्तन सभागृह आधीच अस्तित्वात आहे. मला आशा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाविक आणि वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन या प्रकल्पाचा पुनर्विचार करतील आणि ऐतिहासिक वारसा जतन करणारा पर्यायी मार्ग काढतील," असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.