पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रिपदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 14:24 IST2025-07-25T14:24:17+5:302025-07-25T14:24:41+5:30
Rahul Narvekar News: शिंदेसेना आणि अजित पवार गटातील मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रिपदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
Rahul Narvekar News: राज्यातील मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल. तसेच काहीही केले तरी चालते, अशी भावना तयार होईल. यासाठी काही निर्णय घ्यावेच लागतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. वादग्रस्त विधान करणारे नको, काम करणारे हवेत, यासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा मंत्रिमंडळातील समावेशाबाबत होत आहे, असेही म्हटले जात आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
पत्रकारांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, मीडियातील बातम्यांवर मी विशेष लक्ष देत नाही. कारण असा निर्णय माझ्या पक्षाचा आहे. मी अत्यंत संतुष्ट आहे.माझ्या पक्षाने जी जबाबदारी मला दिली आहे, त्यातूनच मी सामान्यातल्या सामान्य महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील व्यक्तीला न्याय देऊ शकलो. विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाजाचा दर्जा उंचावण्याची संधी मला मिळाली. १५२ लक्षवेधी एका अधिवेशनात मांडण्यात आल्या. कामकाज वाढले. मुंबई आणि नागपूर येथील विधानभवनाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बदलले आहे. आम्ही पूर्ण डिजिटलाइज केलेले आहे. दोन्ही सभागृह आता पेपरलेस आम्ही करत आहोत. विधानसभा अध्यक्ष म्हणून मला चांगले काम करण्याची संधी मिळाली आहे, असे राहुल नार्वेकर यांनी नमूद केले.
पक्ष जे ठरवेल, ते मी स्वीकारेन
माझा पक्ष मला जी कोणती जबाबदारी देईल, ती पार पाडण्यासाठी मी नेहमीच तयार असेन. मला आमदार म्हणून काम करायला सांगितले, तर आमदार म्हणून काम करेन. इतर कोणतीही जबाबदारी दिली, तरी ती स्वीकारेन. कामाची नोंद घेतली जात असेल, तर कोणत्याही व्यक्तीला आनंदच होईल. कुणी नोंद घ्यावी म्हणून नाही, तर जनतेची सेवा व्हावी म्हणून आपण काम करत असतो. तेच मी करत आहे. मी अत्यंत संतुष्ट आहे. पण, पक्ष जे ठरवेल, ते मी स्वीकारेन. माझ्या पक्षाची इच्छा ती माझी इच्छा, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सगळे जण चांगले काम करत आहेत. परंतु, काही लोकांना पक्षाला संधी द्यायची असेल. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल, तो सर्वांनी स्वीकार असेल. विधानसभा अध्यक्षपद हे मंत्र्यांपेक्षा वरचे पद आहे, आनंद कसा होईल? अशी प्रतिक्रिया देत, जी जबाबदारी मला दिली जाईल, ती पार पाडायला तयार आहे. विधानसभा अध्यक्ष असेन, मंत्री असेन किंवा आमदार असेन, जनतेसाठी मला काम करायचे आहे, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.