"ही सर्व मुघली संस्कृती, भारतीय संस्कृतीत..."; PM मोदींच्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भातील राऊतांच्या विधानावर फडणवीस स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:25 IST2025-03-31T15:25:03+5:302025-03-31T15:25:44+5:30
"भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो. ही सर्व मुघली संस्कृती आहे की, वडिल जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

"ही सर्व मुघली संस्कृती, भारतीय संस्कृतीत..."; PM मोदींच्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भातील राऊतांच्या विधानावर फडणवीस स्पष्टच बोलले
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुढीपाड्यानिमित्त नागपुरातील संघ कार्यालयात पोहोचले होते. येथे त्यांनी संघाचे संस्थापक तथा पहिले सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना आदरांजली अर्पण केली. यानंतर ते संघाच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. त्यांच्या या दौऱ्यासंदर्भात राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगत आहे. यातच, शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या संदर्भात मोठा दावा केला होता. "पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारसदार संघ ठरवेल आणि तो महाराष्ट्रातून असेल," असे विधानन राऊतांनी केले होते. यानंतर, आता "भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो. ही सर्व मुघली संस्कृती आहे की, वडिल जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो -
यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मोदीजी यांचा उत्तराधिकारी शोधण्याचे कुठलेही कारण नाही. मोदीजी आमचे नेते आहेत. आणखी बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत. आमचा आग्रह आहे. आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघत आहोत. संपूर्ण देश बघतो आहे. त्यामुळे आता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो. ही सर्व मुघली संस्कृती आहे की, वडिल जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात. त्यामुळे अत्ता कुणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळही आलेली नाही. तसा प्रश्नही नाही."
नेमकं काय म्हणाले होते राऊत? -
एका पत्रकार परिषदेदरम्यान, मोदींचे वारसदार कोण असतील? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले होते, "यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्णय घेईल, असे दिसते. यावर, मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच बघायला मिळेल? असा प्रश्न केला असता राऊत म्हणाले होते, यामुळेच मोदींना काल बोलाऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. तसेच, संघाची चर्चा ही बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही. तरीही काही संकेत जे असतात, ते स्पष्ट आहेत. पुढचा नेता संघ ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल."
ही काही साधी गोष्ट नाही... -
तसेच, "जी माहिती बाहेर येत आहे, ती स्पष्ट आहे की, सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी जे धोरण जाहीर केले आहे की, 75 वर्षं झालेल्या व्यक्तीने सत्तेच्या कोणत्याही पदावर राहू नये. यामुळे सरसंघचालकांनी त्यांना या त्यांच्या भूमिकेची अथवा संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा केली. की आता आपली वेळ आली आहे. सप्टेंबर महिना येतो आहे. तेव्हा देशाचे नेतृत्व बदलावे लागेल. ज्या अर्थी पंतप्रधान मोदींना 10-11 वर्षांनंतर नागपुरात जाऊन सरसंघचालकांना भेटावे लागले, ही काही साधी गोष्ट नाही, असेही राऊत यांनी म्हटले होते.