राऊतांची भुजबळांवर आगपाखड, अजित पवारच शिवसेनेचे स्टार प्रचारक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 16:47 IST2019-10-19T16:42:40+5:302019-10-19T16:47:02+5:30
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती.

राऊतांची भुजबळांवर आगपाखड, अजित पवारच शिवसेनेचे स्टार प्रचारक
मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांना टोला लगावलाय. येवला आणि लासलगाव येथे संभाजी पाटलांचे स्टार प्रचारक अजित पवारच आहेत. जी गोष्ट आम्ही सांगत नव्हतो, ती गोष्ट त्यांनीच सांगितली. बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचं काम हे छगन भुजबळांनी केलंय, हे अजित पवारांनीच सांगितल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बाळासाहेबांना त्याकाळी अटक करण्यात आलेल्या कृत्यावर मोठा खुलासा केला होता. वरिष्ठांच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक करण्यात आली. बाळासाहेबांना अटक ही राष्ट्रवादीची चूक होती. त्या काळामध्ये आमचंही स्वतःचं मत होतं. इतक्या टोकाचं राजकारण कोणी करू नये, त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. काही जणांच्या हट्टापायी तसं करण्यात आलं, असं म्हणत अजित पवारांनी छगन भुजबळ यांच्यावर नेम धरला होता.
अजित पवारांच्या या विधानवरुन खासदार संजय राऊत यांनी भुजबळांवर प्रहार करताना अजित पवारांना शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हटले आहे. कॅबिनेटमध्ये आम्ही विरोध करत होतो, बाळासाहेब यांच्या अटकेचं पाप करू नका. महाराष्ट्रात वणवा पेटलं, असं आम्ही सागंत होतो, तरी छगन भुजबळ यांनी हट्टाने बाळासाहेबांना अटक करुन तुरुंगात ढकलण्याचा घाट केला, हे भांड अजित पवारांनी फोडलंय. त्यामुळेच, अजित पवारच शिवसेनेचे स्टार प्रचारक आहेत. आता, तुरुंगात जाण्याची वेळ भुजबळांवरच आली, ते तुरुंगात गेले अन् तेथे 60 व्होल्टचे बल्ब लावले, भिंतीला रंग लावला. भुजबळांनी मतदारसंघात न केलेली विकासकामं तुरुंगात जाऊन केली, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. लासलगाव येथील शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राऊत यांनी अजित पवारांना टार्गेट केलं.