RajyaSabha Election Maharashtra: मविआ नेत्यांनी फडणवीसांची भेट का घेतली? शिवसेना संकटात; मोठे कारण समोर आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 11:55 IST2022-06-03T11:54:31+5:302022-06-03T11:55:19+5:30
शिवसेना खासदार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री आज लगबगीने फडणवीसांच्या बंगल्यावर गेले होते. विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीबद्दल जी भीती वाटत होती, तीच भीती पुन्हा वाटू लागली आहे.

RajyaSabha Election Maharashtra: मविआ नेत्यांनी फडणवीसांची भेट का घेतली? शिवसेना संकटात; मोठे कारण समोर आले
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात रणकंदन सुरु असताना महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने नुकतीच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. परंतू, भाजपा आता माघार घेण्याच्या मूडमध्ये नाही, असे स्पष्ट संकेत फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिल्याने शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यातूनच मविआच्या नेत्यांनी फडणवीसांची भेट का घेतली याचे मोठे कारण समोर आले आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आमदारांची मते न फुटण्यासाठी व्हीप जरी जारी केला तरी देखील भाजपाला मते देणाऱ्या आमदारांवर कारवाई होऊ शकत नाही, असे गुरुवारीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीची मते फुटली तर शिवसेनेच्या किंवा काँग्रेसच्या लादलेल्या उमेदवाराचा पराभव होण्याची भीती मविआला वाटत आहे. दुसरीकडे फडणवीसांनी आमच्या सहाव्या जागेसाठीच्या मतांची बेगमी झाली आहे, त्यामुळे उमेदवार मागे घेणार नसल्याचे मविआच्या शिष्टमंडळाला सांगितले आहे.
यामुळे शिवसेनेला विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीबद्दल भीती वाटत होती, तीच भीती पुन्हा वाटू लागली आहे. आमदारांची मते फुटली तर पराभव नक्की आणि त्याहूनही मोठी बाब म्हणजे जर काँग्रेसचा उमेदवार इम्रान प्रतापगढी यांचा पराभव झाला तर राज्यातील सत्ता जाणे देखील नक्की, अशा पेचात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अडकले आहेत.
इम्रान प्रतापगढी हे प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. काहीही झाले तरी प्रतापगढींना निवडून आणा, असा स्पष्ट निरोप काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आला आहे. यामुळे आपल्या आमदारांवर विश्वास नसलेल्या काँग्रेसने शिवसेनेवर उमेदवार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. यातच प्रतापगढी यांची उमेदवारी लादल्याने राज्यातील काँग्रेस नेते नाराज आहेत. यामुळे हे नाराज आमदार फुटण्याची दाट शक्यता काँग्रेसला वाटत आहे. यामुळे राज्यसभेची एक जागा महत्वाची की राज्यातील सत्ता, असा सूचक इशाराच काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेला देण्यास सुरुवात केली आहे. या पेचात अडकल्यानेच शिवसेना खासदार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री आज लगबगीने फडणवीसांच्या बंगल्यावर गेले होते. परंतू तिथेही त्यांना नकार मिळाल्याने शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
शिवसेना अडकित्यात अडकली...
काही महिन्यांत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यातच राज्यसभेची जागा शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. भाजपाने शिवसेनेला यावरून खिंडीत अडवण्यासाठी आपलाही उमेदवार दिला आहे. त्यातच काँग्रेसने राज्याबाहेरील उमेदवार दिल्याने मोठा पेच झाला आहे. काँग्रेसला आपल्याच आमदारांची मते पडतील की नाही याची शाश्वती नाहीय. यामुळे शिवसेनेला उमेदवार माघारी घेण्यास भाग पाडायचे, एवढा एकच पर्याय काँग्रेस नेत्यांना दिसत आहे. दुसरीकडे भाजपा वरचढ ठरेल याची चिंता शिवसेनेला आहे. महापालिका निवडणुकीआधीच राज्यातील सत्ता गमविणे शिवसेनेला परवडणारे नाही. तसेच पालिकांमध्ये तीन पक्ष एकत्र लढले तर फायदा होईल, ते देखील नुकसान झाले तर परवडणार नाही. यामुळे राज्यसभेतून माघार घेणेच शिवसेनेला सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार योग्य ठरेल.