RajyaSabha Election Maharashtra: तेव्हाची गोष्ट वेगळी होती; काँग्रेसचा उमेदवार पडल्यावरून संजय राऊतांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 15:41 IST2022-06-03T15:41:30+5:302022-06-03T15:41:44+5:30
इम्रान प्रतापगढी हे प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. काहीही झाले तरी प्रतापगढींना निवडून आणा, असा स्पष्ट निरोप काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आला आहे.

RajyaSabha Election Maharashtra: तेव्हाची गोष्ट वेगळी होती; काँग्रेसचा उमेदवार पडल्यावरून संजय राऊतांची प्रतिक्रिया
भाजपाने सरकार अस्थिर करण्याची, आमदारांना अस्थिर करण्यासाठी राज्यसभेची निवडणूक लादल्याचा आरोप शिवसेना नेते आणि राज्यसभा उमेदवार संजय राऊत यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच मविआचे नेते फडणवीसांना भेटण्यासाठी गेले होते, असे स्पष्टीकरणही राऊत यांनी दिले.
निवडणूक लादली गेली आहे. निवडणुका आल्या की बैठका होत असतात. आम्हाला राज्यसभेबरोबरच २० जूनला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीचीही आताच तयारी करावी लागेल, असेही राऊत यांनी सांगितले. राज्यसभा निवडणुकीच्या इतिहासात काँग्रेसचा उमेदवार पडला होता, यावर विचारले असता राऊत यांनी तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा गुप्त पद्धतीने मतदान होत होते. आता पक्ष प्रतोदाला आपले मत दाखवून ते टाकावे लागते. यामुळे तेव्हा जसा प्रकार घडला तो आता घडणे शक्य नाही, असेही राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांसोबत अपक्ष आमदारांची चांगली चर्चा झाली, असेही राऊत म्हणाले.
इम्रान प्रतापगढी हे प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. काहीही झाले तरी प्रतापगढींना निवडून आणा, असा स्पष्ट निरोप काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आला आहे. यामुळे आपल्या आमदारांवर विश्वास नसलेल्या काँग्रेसने शिवसेनेवर उमेदवार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. यातच प्रतापगढी यांची उमेदवारी लादल्याने राज्यातील काँग्रेस नेते नाराज आहेत. यामुळे हे नाराज आमदार फुटण्याची दाट शक्यता काँग्रेसला वाटत आहे. यामुळे राज्यसभेची एक जागा महत्वाची की राज्यातील सत्ता, असा सूचक इशाराच काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेला देण्यास सुरुवात केली आहे. या पेचात अडकल्यानेच शिवसेना खासदार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री आज लगबगीने फडणवीसांच्या बंगल्यावर गेले होते. परंतू तिथेही त्यांना नकार मिळाल्याने शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
आता अर्ज भरण्याची मुदत संपल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या राजकारणात दोन्ही बाजूने आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा करत आहेत. आमच्याकडे तिसऱ्या उमेदवारासाठी ३० मते जादा आहेत. त्यामुळे आता अपक्ष, इतर पक्षांच्या मदतीवर आम्ही तिसरा उमेदवार निवडून आणू असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.