Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार!

By यदू जोशी | Updated: February 6, 2026 09:56 IST2026-02-06T09:53:22+5:302026-02-06T09:56:17+5:30

राज्यसभेच्या राज्यातील सात जागा रिक्त होणार असून त्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपला फायदा तर महाविकास आघाडीला फटका बसणार आहे.

Rajya Sabha Election 2026: Mahavikas Aghadi will suffer a big blow in the Rajya Sabha elections! | Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार!

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार!

यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: राज्यसभेच्या राज्यातील सात जागा रिक्त होणार असून त्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपला फायदा तर महाविकास आघाडीला फटका बसणार आहे. सध्या या सातपैकी चार खासदार हे महाविकास आघाडीचे आहेत पण, आता त्यांना एकाच जागेवर समाधान मानावे लागू शकते. 

ज्येष्ठ नेते शरद पवार (राष्ट्रवादी), केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे डॉ. भागवत कराड, धैर्यशील पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, उद्धवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) फौजिया खान हे सात खासदार २ एप्रिल रोजी निवृत्त होतील. त्यानंतर लगेच या सात जागांसाठी निवडणूक होईल. विधानसभेच्या सदस्यांमधून राज्यसभेवर पाठवावयाच्या या जागा आहेत. 

हे सात जण २०२० मध्ये राज्यसभेवर निवडून गेले होते, तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते आणि एकत्रित महाविकास आघाडीच्या चार जागा निवडून आलेल्या होत्या. त्यावेळी महाविकास आघाडीचे असलेले संख्याबळ आज खूपच घटले आहे. त्यामुळे पुन्हा त्यांचे चार खासदार निवडून जाण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यांच्या वाट्याला एक जागा जाऊ शकते. 

शरद पवार यांचे काय? 

महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेवर पुन्हा पाठविले जाईल का, हा महत्त्वाचा मुद्दा असेल. पवार यांनी ५ नोव्हेंबर २०२४ रोजी असे म्हटले होते की, मी लोकसभा निवडणूक लढणार नाही. दीड वर्षांनंतर माझी राज्यसभेची टर्म संपेल तेव्हा पुन्हा राज्यसभेवर जायचे की नाही याचा मी विचार करेन. आता ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे. मविआतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्धवसेनाचा या जागेवर दावा असेल.

कसे आहे संख्याबळ? 

- राज्य विधानसभेचे सध्याचे संख्याबळ हे २८६ इतके आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त आहेत. एक जागा निवडून येण्यासाठी ३७ आमदारांचा कोटा असेल. सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे १६ आणि उद्धवसेनेचे २० असे तीन पक्षांचे मिळून ४६ आमदार आहेत. माकप आणि शेकापचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. 

- मविआ एकत्र राहिली आणि या दोघांनी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर एक खासदार निश्चितपणे निवडून जाईल. मात्र, त्या परिस्थितीत ती एक जागा उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यापैकी कोणाला द्यायची यावर एकमत व्हावे लागेल. ३७ मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर मविआकडे केवळ ११ मते शिल्लक असतील. समाजवादी पार्टीचे २ तर एमआयएमचे एक आमदार सोबत गेला तर १४ मते अतिरिक्त असतील. 

- महायुतीची स्थिती खूपच मजबूत आहे. भाजपचे १३१, शिंदेसेनेचे ५७, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ४० असे मिळून २२८ आमदार आहेत. सात आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याने हे संख्याबळ २३५ इतके आहे. त्यामुळे त्यांचे सहा उमेदवार राज्यसभेवर नक्कीच निवडून जातील. भाजपने सातवा उमेदवार दिला तर चुरस होईल. 

Web Title : राज्यसभा चुनाव 2026: महा विकास अघाड़ी को झटका, भाजपा को फायदा।

Web Summary : राज्यसभा चुनाव 2026 महाराष्ट्र की राजनीति को प्रभावित कर सकता है। भाजपा को फायदा होने की संभावना है, जबकि महा विकास अघाड़ी (एमवीए) गठबंधन को नुकसान हो सकता है, संभावित रूप से सात आगामी रिक्तियों में से केवल एक सीट सुरक्षित हो सकती है। शरद पवार की भविष्य की भूमिका अनिश्चित है।

Web Title : Setback for MVA in Rajya Sabha Election 2026, BJP to gain.

Web Summary : The Rajya Sabha election 2026 could significantly impact Maharashtra's political landscape. The BJP is poised to gain seats while the Maha Vikas Aghadi (MVA) alliance is expected to lose ground, potentially securing only one seat out of the seven upcoming vacancies. Sharad Pawar's future role remains uncertain.