Raju Shetti on MSRC: शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजू शेट्टी हे सरकारविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. अशातच राजू शेट्टी यांनी एसटी बससेवा सुरु करण्यावरुन एसटी प्रशासनासह सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राजू शेट्टी यांनी एसटी प्रशासनाकडे नांदेड येथे बससेवा सुरु करण्यासाठी पत्र लिहीलं होत. मात्र परिवहन विभागाने चालक नसल्याने बससेवा सुरु करता येणार नसल्याचे म्हटल आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही गावात चालक नसल्याने बससेवा सुरू करता येणार नसल्याने ही शोकांतिका असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलं.
राजू शेट्टी यांनी एक्स पोस्टमध्ये प्रशासनाने पाठवेलेल्या पत्राची प्रत शेअर केली आहे. "एकीकडे बुलेट ट्रेन ,हायपरलूप ट्रेन , ८६ हजार कोटीचा शक्तीपीठ यासारखे प्रकल्प होत असताना दुसरीकडे मात्र चालक -वाहक नसल्याने ७५ वर्षापासून एस टी सेवा मिळेना ही शोकांतीका विकसीत राज्याची. चालक-वाहक नसल्याने एस.टी. सेवा देता येणार नाही असे लेखी पत्र महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने मला पाठवून दिले. नांदेड जिल्ह्यातील भोकर -हस्सापूर-बेंबर -हाडोळी-कळगांव -कारला -पळसगांव -तांडा-गोरठा-उमरी या मार्गावर बससेवा सुरू करण्यासाठी पत्र दिले होते. परिवहन विभागाकडे वाहक व चालक नसल्याने बससेवा सुरू करता येणार नाही असे लेखी कळविले. एकीकडे बुलेट ट्रेन , हायपरलूप ट्रेन , मेट्रो , शक्तीपीठ यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. दुसरीकडे मात्र स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही गावात वाहक व चालक नसल्याने बससेवा सुरू करता येणार नाही अस राज्य सरकार सांगत आहे," असं राजू शेट्टी यांनी म्हटलं.
परिवहन विभागाने काय म्हटलं?
"आपण पत्रात नमुद केलेल्या सुचनेप्रमाणे भोकर-हस्सापुर-बेंवर-हाडोळी-कळगांव-कारला-पळसगांव-पळसगांव तांडा गोरठा-उमरी या मार्गावर बससेवा सुरु करणेबाबत कळविले आहे. परंतु सध्या नांदेड विभागात चालक/वाहक कमतरतेमुळे उपरोक्त मार्गावर बससेवा सुरु करणे शक्य होणार नाही. विभागात चालक / बाहक उपलब्ध झाल्यास सदर मार्गावर रा.प.बससेवा सुरु करण्यात येईल. तसेच केलेली कार्यवाही आपणांस अवगत करण्यात येईल. आपण केलेल्या मौलीक सुचनेबद्दल व रा.प. महामंडळाच्या कामकाजात दाखविलेल्या आस्थेबद्दल आभारी आहे," असं या पत्रात म्हटलं आहे.