राज-उद्धव भेटीने युतीचे संकेत अधिक स्पष्ट; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंधुभेटीवरून राजकीय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 08:14 IST2025-10-06T08:13:57+5:302025-10-06T08:14:37+5:30
ठाकरे बंधूंच्या सातत्याने वाढत असलेल्या भेटी तसेच उद्धवसेना आणि मनसे युतीबाबत दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून केले जाणारे भाष्य यामुळे या दोन्ही पक्षांच्या युतीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

राज-उद्धव भेटीने युतीचे संकेत अधिक स्पष्ट; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंधुभेटीवरून राजकीय चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेसह राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे बंधूंच्या भेटी वाढल्या असून, रविवारी राज ठाकरे यांनी अचानक ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
ठाकरे बंधूंच्या सातत्याने वाढत असलेल्या भेटी तसेच उद्धवसेना आणि मनसे युतीबाबत दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून केले जाणारे भाष्य यामुळे या दोन्ही पक्षांच्या युतीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यापूर्वी गणेशोत्सवात उद्धव ठाकरे दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गेले होते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा उद्धव ‘शिवतीर्थ’वर गेले आणि तिथे युतीसंदर्भात दोन्ही बंधूंची प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर रविवारी राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले आणि तिथे दोन्ही बंधूंनी पुन्हा युतीबाबत चर्चा केल्याचे समजते. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांत ठाकरे बंधू वेगवेगळ्या निमित्ताने ५ वेळा एकत्र आले आहेत.
रविवारी खा. संजय राऊत यांच्या नातीच्या बारशानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. दोन्ही बंधू राऊतांसह इतर सहकाऱ्यांसोबत गप्पा मारताना दिसले. तसेच निघताना दोघेही एकत्रितपणे बाहेर पडले. त्यावेळी स्वतः रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना निरोप दिला.
तीन महिन्यांत ५ वेळा भेट
५ जुलै - मराठी भाषेच्या मेळाव्यात एकत्र
२७ जुलै - उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर
२७ ऑगस्ट - गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी
१० सप्टेंबर - चर्चेसाठी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी
५ ऑक्टोबर - संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकत्र, त्यानंतर ‘मातोश्री’वर भेट
‘मातोश्री’वर दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा
भेटीनंतर राज ठाकरे आपल्या घरी न जाता थेट ‘मातोश्री’वर गेले. ‘मातोश्री’वर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील मिळाला नसला तरी मुंबई महापालिकेसह राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.