राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 19:07 IST2025-08-31T19:07:15+5:302025-08-31T19:07:56+5:30
मी हे बोलतोय, ते काही लोकांना माहिती पडावे म्हणून बोलतोय. १० टक्के आरक्षण आम्ही मराठा समाजाला दिले असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
सातारा - मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना मुंबईत का यावे लागले याबाबत एकनाथ शिंदे यांनाच विचाराला असं सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवले होते. त्यावरून राज ठाकरेंनी पूर्ण माहिती घ्यायला हवी होती असं प्रत्युत्तर शिंदेंनी दिले आहे.
सातारा येथे पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंबाबत प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले की, राज ठाकरे यांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती. १० टक्के आरक्षण आम्ही दिले. खरेतर आरक्षण कुणामुळे गेले त्यांना राज ठाकरेंनी हा प्रश्न विचारायला हवा होता. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील आरक्षण हायकोर्टात आम्ही टिकवले, परंतु सुप्रीम कोर्टात आरक्षण का टिकवू शकला नाही, हा प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला विचारायला पाहिजे होता असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला.
तसेच मी हे बोलतोय, ते काही लोकांना माहिती पडावे म्हणून बोलतोय. १० टक्के आरक्षण आम्ही मराठा समाजाला दिले. न्या.शिंदे समिती स्थापन करून अनेक पुरावे शोधून कुणबी नोंदी शोधल्या गेल्या. १९६७ पूर्वीच्या अनेक नोंदी शोधल्या. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले. त्याचाही लाभ मराठा समाज घेत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मुंबईतील मराठा आरक्षणावर राज ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी मला वाटते, या सगळ्या गोष्टींची उत्तरे तुम्हाला एकनाथ शिंदेंच देऊ शकतात. शिंदे जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा. सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. यावर एकनाथ शिंदेंच उत्तर देऊ शकतात. मुंबईकरांना जर त्रास होत असेल तर त्याचे उत्तर एकनाथ शिंदे देऊ शकतात. ते मागील वेळी नवी मुंबईत जाऊन प्रश्न सोडवून आले होते, मग ते मुंबईत का आले यावर शिंदेंच उत्तर देतील. या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही एकनाथ शिंदे यांना विचारा असं सांगत राज ठाकरेंनी शिंदेंकडे बोट दाखवले होते.