Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 13:18 IST2025-10-19T13:15:53+5:302025-10-19T13:18:16+5:30
Raj Thackeray Speech: अनेकजण म्हणतात राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते. परंतू मतामध्ये येत नाही. असे केलात तर कशी मते पडतील, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...
गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभेनंतर जवळपास ९६ लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत. यापैकी ८-१० लाख मुंबईत आहेत. पुण्यातही तितकेच आहेत. यावरून आम्ही मतदार यादी तयार केली आणि जेव्हा दरवाजावर टकटक होऊ लागली, तेव्हा समजले काय प्रकार सुरु आहेत ते. निवडून आलेले आमदार अवाक् झाले होते. त्यांनाही समजेना कसे निवडून आलो ते. अनेकजण म्हणतात राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते. परंतू मतामध्ये येत नाही. असे केलात तर कशी मते पडतील, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
खात्रीलायक समजलेली गोष्ट सांगतो. १ जुलैला यादी बंद करून टाकली. विधानसभेनंतर जवळपास ९६ लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत. मुंबईत ८-१० लाख, पुण्यात तेवढेच. प्रत्येक गावागावात भरले आहेत. अशाच निवडणुका होणार आहेत आपल्या देशात तर कशासाठी प्रचार करायचा, कशासाठी मतदान करायचे, कशासाठी रांगेत रहायचे. मग सांगायचे की यांचा एकही आमदार, खासदार निवडून आला नाही. आम्ही निवडणूक आयोगाला या याद्या सुधारा म्हणून सांगतोय, पण समजत नाहीय सत्ताधारी कशाला चिडतायत. लागतेय ना कुठेतरी. हे सत्ताधारी उत्तर देत बसतात, कशासाठी? असे राज म्हणाले. तसेच यादीनुसार मतदार तपासा, त्यावर राहतोय नाही राहतोय टीक करा आणि मतदानाला आला की पकडा, असे राज यांनी सांगितले.
हीच माणसे जेव्हा विरोधात होती, तेव्हा आता मी जे बोलतोय तेच बोलत होते. माझ्याकडे नरेंद्र मोदींचे आसाममधील भाषण आहे. त्याची शेवटची १० सेकंद नीट ऐका, असे म्हणत राज यांनी मोदींचे तेव्हाचे भाषण ऐकवले. तसेच मी काय वेगळे बोलतोय असे राज म्हणाले. तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, आता ते पंतप्रधान आहेत. मोदी तेव्हा निवडणूक आयोगाला म्हणत होते तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहोत, असे राज म्हणाले.
महाराष्ट्रात यांची हिंमत कुठे गेलीय, सत्ताधारी पक्षाचा आमदार जाहीर भाषणात म्हणतो, मी २० हजार मतदार बाहेरून आणले. पैठणचे आमदार भुमरे आहेत. शिंदेंनी त्यांना डोळा मारला. मग ते म्हणाले हे बाहेर गेले होते, स्थलांतरीत मतदार होते, त्यांना मी आणले. बेधडक नाकावर टिच्चून बोलत आहेत. महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांचा अपमान करत आहेत. प्रत्येकाने असे मतदार बाहेरून आणले आहेत. ही त्यांचीच माणसे बोलत आहेत. निवडणूक आयोगाच्या यादीत घोळ आहे हे बोलणारे कोण आहेत, आम्ही आहोत. सतीश चव्हाण, गायकवाड, मंदा म्हात्रे हे तिघेही आमदार आहेत. तिघेही काय बोलतात ते ऐका, असे सांगत राज यांनी याचेही व्हिडीओ व्यासपीठावर लावले. एकात ३६ हजार दुबार नावे असल्याचे आमदार सांगत आहे. दुसरा आमदार देखील जिल्ह्यात लाखापेक्षा जास्त नावे अशी आहेत जे मृत आहेत, ३० वर्षापूर्वी राहून गेले आहेत. तर म्हात्रे म्हणाल्या की, बोगस नावे काढण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. ही लोक सकाळी सकाळी मतदान करून जातात. त्याचा फटका उमेदवाराला बसू शकतो. सत्ताधारी पक्षाचे आमदार हे सांगत आहेत, असा आरोप राज यांनी केला.