दोन दिवसांत गद्दारांची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरे गरजले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 13:41 IST2020-02-15T13:41:10+5:302020-02-15T13:41:28+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा तीन दिवसीय औरंगाबादचा दौरा पूर्ण झाला असून आज ते मुंबईकडे रवाना होणार आहे.

दोन दिवसांत गद्दारांची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरे गरजले
मनसेप्रमुखराज ठाकरे यांचा तीन दिवसीय औरंगाबादचा दौरा पूर्ण झाला असून आज ते मुंबईकडे रवाना होणार आहे. मनसे मेळाव्यात राज ठाकरेंनी आज पुन्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच मनसे पक्षातील काही पदाधिकारीच वाईट बातम्या पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा गद्दारांची दोन दिवसात पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, मनसे पक्षाबाबत काही पदाधिकारी जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवत आहे. तसेच अशा पदाधिकारांची नावं देखील माझ्याकडे आली असून अशा गद्दारांबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला आहे.
राज ठाकरेंनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना औरंगाबादच्या नामकरणाबाबात प्रश्न विचारला असता औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत असं सांगत शिवसेनेला टोला लगावला. त्यामुळे आगामी काळात औरंगाबादचं संभाजीनगर नाव करण्यासाठी मनसे आक्रमकपणे भूमिका मांडणार असल्याचंही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
आज सन्मा. राजसाहेबांनी संभाजीनगर येथील महाराष्ट्र सैनिकांना येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं. त्या मेळाव्याची क्षणचित्रं...#राजठाकरे_महाराष्ट्रदौराpic.twitter.com/9b3cWwWBRX
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 15, 2020
दरम्यान, मनसेला शिवसेनेचं उष्ट खाण्याची सवयच लागली आहे असं सांगत शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसेवर निशाणा साधला होता. तर मनसेचे अविनाश जाधव यांनीही त्याला प्रत्युत्तर देत मागच्या ५ वर्षात शिवसेना सत्तेत होती, आताही सत्तेत आहे पण औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची हिंमत झाली नाही आणि आम्ही त्याचा उच्चार केला तर त्याची एवढी धास्ती घेतली असा टोला शिवसेनेला लगावला आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी सज्ज झाली असल्याचं दिसून येत आहे.