‘मनसे आपत्ती व्यवस्थापन’ पथकाची राज ठाकरेंकडून घोषणा; ५० प्रशिक्षित कार्यकर्ते, कसं करेल काम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 15:27 IST2021-07-20T15:24:20+5:302021-07-20T15:27:27+5:30
राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा करण्यात आली आहे.

‘मनसे आपत्ती व्यवस्थापन’ पथकाची राज ठाकरेंकडून घोषणा; ५० प्रशिक्षित कार्यकर्ते, कसं करेल काम?
पुणे – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे तयारीला लागले आहेत. पुणे-नाशिक दौऱ्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या दौऱ्यात राज ठाकरेंनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा करण्यात आली आहे. पूर, इमारत दुर्घटना यासारख्या संकटकाळात मनसेचं आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाच्या मदतीसाठी तयार असणार आहे. या आपत्ती व्यवस्थापनात प्रशिक्षित पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांचा समावेश असणार आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकात ५० मुला-मुलींचा समावेश असेल. शहरातील पूरस्थिती, इमारता दुर्घटना तसेच नैसर्गिक आपत्तीत मनसेचे आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाची मदत करणार आहे. या पथकातील सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते या आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा करण्यात आली. पुण्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यासाठी हे पथक तयार असणार आहे. ५० जणाचे हे पथक अडचणीत असलेल्या पुणेकरांच्या मदतीला धावून येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विशेष आपत्ती पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
राज ठाकरे पुण्यात
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मनसेच्या नव्या शहर कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पुण्यात आलेल्या पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्याला पुन्हा आणखी तीन दिवस दिले आहेत. या तीन दिवसीय दौ-यात विधानसभानिहाय बैठका घेतल्या जात आहेत. त्याची सुरुवात सोमवारी झाली. राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळच्या सत्रात वडगावशेरी आणि कोथरूड विधानसभा मतदार संघातील आणि दुपारच्या सत्रात कोथरूड आणि खडकवासला विधानसभा मतदार संघातील पदाधिका-यांशी संवाद साधला. प्रभाग अध्यक्ष, उपाध्यक्ष ही पदे रद्द करून शाखाध्यक्ष, शाखा उपाध्यक्ष यांची नियुक्ती करण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले. या शाखाध्यक्ष आणि उपाध्यक्षांची यादीही त्यांनी मागविली आहे. जो शाखा अध्यक्ष किंवा पदाधिकारी पक्षाचे काम उत्तमरित्या करील त्याच्या घरी जेवायला येऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.