राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 07:15 IST2020-04-20T04:08:09+5:302020-04-20T07:15:16+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील नियुक्तीवरून राजकारण तापले

राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये- संजय राऊत
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील नियुक्तीवरून राजकारण तापले आहे. आमदारकीच्या प्रस्तावावर राजभवनाने अद्याप आपल्या संमतीची मोहोर उठविली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट राज्यपालांवरच निशणा साधला. राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, असे राऊत यांनी म्हटले आहे.
राज्य मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठविला आहे. त्यावर राज्यपालांनी अद्याप निर्णय दिलेला नाही. राजभवनाकडून याविषयी कायदेशीर सल्ला घेतला जात असल्याचेही वृत्त आले. दरम्यान, एका भाजप पदाधिकाऱ्याने या ठरावालाच न्यायालयात आव्हान दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ट्विटद्वारे आपली नाराजी व्यक्त केली. तसेच, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा थेट उल्लेख न करता शरसंधानही साधले. ‘राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही, पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!’, अशा शब्दात राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. तर राजभवन हे कोणाला अड्डा वाटत असेल तर हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे.