शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 11:29 IST2025-08-06T11:28:17+5:302025-08-06T11:29:03+5:30
एखाद्या युद्धात जितके मृत पावत नाहीत तितके सरकारच्या धोरणामुळे मृत्यू होत असतील तर हा गंभीर विषय आहे असं बच्चू कडू यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
मुंबई - मुंबई अनेकदा आम्ही बंद होताना पाहिली. ही मुंबई शेतकऱ्यांसाठी एक दिवस बंद राहिली पाहिजे. मुंबईने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावे, ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथूनच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आवाज उठावा या अपेक्षा आमच्या राज ठाकरेंकडून आहेत. शेतकरी हा विषय एका पक्षाचा नाही, एका जातीधर्माचा नाही. शेतकरी सर्व जातीधर्माचा आहे. त्यामुळे मनसे यात पुढे आली तर निश्चितच शेतकरी आंदोलनाला बळ मिळेल. आमचा अजेंडा निवडणुकीचा नाही. मरणारा शेतकरी वाचवायचा आहे असं प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी सांगितले. कडू यांनी मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली.
या भेटीत दोन्ही नेत्यांनी शेतकरी प्रश्नावर चर्चा केली. या भेटीनंतर बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांचा विषय हाच आमच्यात संवाद होता. शेतकरी मुद्द्यावर कसं आणि कधी पुढे गेले पाहिजे, आंदोलन काय केले पाहिजे या सर्वांवर एकंदरीत चर्चा झाली. शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकार शेतकऱ्यांची टिंगलबाजी करतंय हे फार चुकीचे आहे. दुष्काळ पडला तर कर्जमाफीचा विचार करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. दुष्काळ पडायची वाट शेतकऱ्यांनी पाहावी असं चित्र सरकारकडून उभे केले जात आहे. ही शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी गोष्ट आहे. दुष्काळापेक्षा जास्त नुकसान पिकाला भाव मिळत नाही म्हणून होत आहे. मागील २ वर्षापासून मालाचे दर घसरत आहेत. हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या लक्षात आले पाहिजे. हा विषय महत्त्वाचा असल्याने मराठवाड्यात आमची शेतकऱ्यांसाठी यात्रा निघणार आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी आंदोलनाला यावे, शेतकऱ्यांना संबोधित करावे असं त्यांनी बैठकीत सांगितल्याचं म्हटलं.
तसेच शेतकऱ्यांचे आंदोलन जात-धर्म, पक्ष विरहित असायला हवे. राजकारण शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करायचे आहे. मेंढपाळ, मच्छिमार यांना न्याय मिळाला पाहिजे. शेतकरी विषयावर राज ठाकरेंचा अभ्यास दिसून आला. परंतु शेतकरी एकत्र येणार का अशी खंत आहे. शेतकरी एकत्र येत नाही आणि झाला तर राजकारणात होत नाही. शरद जोशींसारख्या माणसाला शेतकऱ्यांनी पाडले होते. हे दुर्दैवी होते. आम्ही लढतोय, राजू शेट्टी असतील ते शेतकऱ्यांसाठी लढा देत आहेत, ते राजकारणात मागेच राहिले आहेत. तरीही राजकारण बाजूला ठेवून शेतकरी लढा उभा राहावा हा आमचा प्रयत्न आहे. ९ तारखेला रक्षाबंधन आहे. आम्ही शेतकऱ्यांकडून सरकारला वेदनेची राखी बांधणार आहोत. आत्महत्या कुटुंबातील महिला राखी बांधतील. रोज १०-१५ शेतकरी आत्महत्या करतायेत. एखाद्या युद्धात जितके मृत पावत नाहीत तितके सरकारच्या धोरणामुळे मृत्यू होत असतील तर हा गंभीर विषय आहे असं बच्चू कडू यांनी सांगितले.
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) August 6, 2025
या भेटीत शेतकरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी होणाऱ्या आगामी आंदोलनाची दिशा, धोरणे आणि मागण्या यावर राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली विचारमंथन करण्यात आले.… pic.twitter.com/cjwruhxYo8
दरम्यान, आता निवडणूक आयोग म्हणतंय, VVPAT देणार नाही मग निवडणुकीला अर्थ काय, त्यापेक्षा भाजपा कार्यालयातून ठपके मारा आणि निवडणूक करा. ईव्हीएम मशिन असेल तर तुम्ही निवडणुका कशाला लढता, हे भय सामान्य नागरिकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये आहे. ही लोकभावना तयार होत आहे असा आरोप करत बच्चू कडू यांनी भाजपावर निशाणा साधला.
३०-४५ मिनिटे झाली बैठक
काही दिवसांपूर्वी अमरावतीत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पदयात्रा काढली होती. त्यात पदयात्रेत मी स्वत: आणि मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यानंतरच्या चक्का जाम आंदोलनालाही पाठिंबा दिला होता. बच्चू कडू हे लढाऊ बाण्याचा व्यक्ती आहे. त्यांनी राज ठाकरेंशी भेटून शेतकरी विषयावर चर्चा केली. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही त्या दृष्टीने आज दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अर्धा पाऊण तास ही बैठक झाली. येणाऱ्या काळात मराठवाडा येथे शेतकरी आंदोलन उभे राहतंय. परभणीपासून पदयात्रा सुरू होतेय, त्याचं निमंत्रण राज ठाकरेंना दिली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.