‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:51 IST2025-09-18T14:45:26+5:302025-09-18T14:51:44+5:30
BJP Counterattacks On Rahul Gandhi: राजुरा मतदारसंघातील मतचोरीवरून राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनंतर भाजपाने पलटवार केला असून, राहुल गांधींचा वोट चोरी आरोपाचा कांगावा म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ चा प्रत्यक्ष पुरावा आहे, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार
मतचोरीवरून आक्रमक झालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज कर्नाटकमधील आळंद आणि महाराष्ट्रातील राजूरा मतदारसंघात झालेल्या मतचोरीवरून गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, राजुरा मतदारसंघातील मतचोरीवरून राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनंतर भाजपाने पलटवार केला असून, राहुल गांधींचा वोट चोरी आरोपाचा कांगावा म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ चा प्रत्यक्ष पुरावा आहे, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. तसेच राहुल गांधी आणि त्यांच्या पोलिटिकल पिलावळीनेच मतदार नोंदणीत बोगस नावे घुसवून आयोगाची दिशाभूल केली नाही ना, अशी शंकाही उपाध्ये यांनी उपस्थित केली.
केशव उपाध्ये म्हणाले की, राहुल गांधींचा वोट चोरी आरोपाचा कांगावा म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ चा प्रत्यक्ष पुरावा आहे. कर्नाटकातील आरोपाचे नाटक पुरते पडले आणि महाराष्ट्रातील मतदानाच्या नावाने थयथयाट करून मतदारांचा अपमान करत देशाला मूर्ख बनविण्याचा बनावही उघडा पडला.
निवडणूक आयोगाच्या आव्हानास सामोरे जाण्याऐवजी तोंड लपवून पोरकटपणा करणाऱ्या राहुल गांधी आणि त्यांच्या पोलिटिकल पिलावळीनेच मतदार नोंदणीत बोगस नावे घुसवून आयोगाची दिशाभूल केली नाही ना, याची चौकशी करण्याची आता आम्हीच मागणी करत आहोत, असेही केशव उपाध्ये म्हणाले.
चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यात संगणकाद्वारे मतदार नोंदणी करण्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करून कोणा टोळक्याने मोठ्या प्रमाणात मतदारांची बोगस नावे घुसविल्याचा संशय भारतीय जनता पार्टीने निवडणुकीआधीच निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारीद्वारे व्यक्त केला होता.
बोगस मतदार घुसविण्याचा प्रकार जेथे घडल्याचे राहुल गांधी म्हणतात तेथे अशा टोळ्यांना अगोदरच कामाला लावले असण्याची शक्यता आता गडद झाली आहे. म्हणूनच बोगस मतदान किंवा व्होट चोरीच्या राहुल गांधींच्या आरोपामागील षडयंत्र शोधून काढण्यासाठी तपासाची सुरुवात तेथूनच व्हावी, अशी मागणीही केशव उपाध्ये यांनी केली.