‘आपल्याच’ राज्यात राधाकृष्णन यांना मताधिक्य कठीण! ‘मविआ’चे ३७, महायुतीचे ३१ खासदार मतदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:54 IST2025-08-19T14:53:53+5:302025-08-19T14:54:07+5:30
राधाकृष्णन मुंबईचे मतदार; त्यांना पवार-ठाकरेंनी पाठिंबा द्यावा: देवेंद्र फडणवीस

‘आपल्याच’ राज्यात राधाकृष्णन यांना मताधिक्य कठीण! ‘मविआ’चे ३७, महायुतीचे ३१ खासदार मतदार
यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘एनडीए’चे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे मतदार असल्याने ते एकप्रकारे महाराष्ट्राचेच आहेत, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे आहेत, हे गृहीत धरले तरी त्यांना या निवडणुकीत ‘आपल्याच’ राज्यात पिछाडीवर राहावे लागू शकते, असे सध्याचे संख्याबळ सांगते.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात. ॲड. उज्ज्वल निकम हे राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य असून, त्यांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे. ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत.
सध्याचे संख्याबळ पाहता महाविकास आघाडीकडे लोकसभा व राज्यसभा मिळून महाराष्ट्रात ३७ इतके संख्याबळ आहे तर भाजपकडे ३१ खासदार आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार असताना आपल्याकडे असलेल्या संख्याबळापेक्षा अधिक मते सी. पी. राधाकृष्णन यांना मिळावीत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार करतील. त्यामुळे उद्या ही निवडणूक झालीच तर काही चमत्कार होईल का, याबाबत उत्सुकता आहे.
लोकसभेतील संख्याबळ - एकूण खासदार संख्या - ४८
काँग्रेस १३, भाजप ९, उद्धवसेना ९, शरद पवार गट - ८, अजित पवार गट १, शिंदेसेना ७, अपक्ष १ (काँग्रेस समर्थक). महाविकास आघाडी ३१, महायुती १८
राज्यसभेतील संख्याबळ - एकूण खासदार संख्या - २०
भाजप ७, काँग्रेस ३, शरद पवार गट २, उद्धवसेना २, शिंदेसेना १, रिपाइं १, अजित पवार गट ३, राष्ट्रपती नियुक्त १. महाविकास आघाडी ७, महायुती १३
राधाकृष्णन मुंबईचे मतदार; त्यांना पवार-ठाकरेंनी पाठिंबा द्यावा : देवेंद्र फडणवीस
उपराष्ट्रपतिपदासाठीचे ‘एनडीए’चे उमेदवार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे-मुंबईचे मतदार आहेत. प्रादेशिक अस्मितेची पाठराखण करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार या नेत्यांनी त्यांना या निवडणुकीत पाठिंबा जाहीर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
ते मूळचे तामिळनाडूचे. पण आजच्या तारखेत ते महाराष्ट्राचे मतदार आहेत. विधानसभेवळी राधाकृष्णन यांनी मुंबईत मतदान केले होते. उद्या ते उपराष्ट्रपतिपदाचा अर्ज भरतील तेव्हा ते महाराष्ट्रातील मतदार असल्याचा उल्लेख अर्जासोबत करतील, असे फडणवीस म्हणाले.
इंडिया आघाडीचा वेगळा उमेदवार रिंगणात उतरविल्यास महाविकास आघाडी त्या उमेदवाराला पाठिंबा देणार की महाराष्ट्राची अस्मिता जपत एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.