questioning the arrest of balasaheb thackarey, chhagan bhujbal says in mumbai | Maharashtra Election 2019 :'तो' माझा नाईलाज होता, बाळासाहेबांच्या अटकेवरील प्रश्नावर भुजबळ उत्तरले

Maharashtra Election 2019 :'तो' माझा नाईलाज होता, बाळासाहेबांच्या अटकेवरील प्रश्नावर भुजबळ उत्तरले

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बाळासाहेबांना त्याकाळी अटक करण्यात आलेल्या कृत्यावर मोठा खुलासा केला होता. वरिष्ठांच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक करण्यात आल्यांचं अजित पवारांनी सांगितले. अजित पवारांचा हा इशारा छगन भुजबळांवर होता का, असा प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला होता. त्यावर, माझा नाईलाज होता, म्हणून मी त्या फाईलवर सही केली, असे भुजबळांनी म्हटलं आहे.

बाळासाहेबांना अटक ही राष्ट्रवादीची चूक होती. त्या काळामध्ये आमचंही स्वतःचं मत होतं. इतक्या टोकाचं राजकारण कोणी करू नये, त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. काही जणांच्या हट्टापायी तसं करण्यात आलं, असे अजित पवारांनी सांगितले होते. त्यावर, राष्ट्रवादीने नेते आणि तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर देताना, आता तो विषय संपल्याचं म्हटलं आहे. 

1999 मध्ये ज्यावेळी आम्ही पक्षाच्या प्रचारासाठी उतरलो, त्यावेळी आमच्या वचननाम्यातच श्रीकृष्ण आयोगाने ज्या लोकांना दोषी ठरवले त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असं होतं. 1995 मध्ये जेव्हा युतीचं सरकार होते, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांविरुद्ध असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यात आला होता. परंतु, श्रीकृष्ण आयोगाची फाईल तशीच ठेवण्यात आली होती. ती फाईल माझ्यासमोर आली तेव्हा मी गृहमंत्री होतो. तेव्हा इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती माझी होती. त्यामुळे मला नाईलाजाने सही करावी लागली. मात्र, हा मुद्दा आता संपल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.

दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. तसेच, बाळासाहेबांच्या अटकेवरुनही राऊत यांनी अजित पवारांवर टीकेचे बाण सोडले. बाळासाहेबांना अटक हा कुणाचा तरी फाजील हट्ट होता. बाळासाहेबांना अटक ही चुक होती... वगैरे वगैरे... हे कळायला इतकी वर्ष लागली का, असा प्रश्न विचारत ही चूक नसून हट्टापायी घेतलेला निर्णय असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.  
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: questioning the arrest of balasaheb thackarey, chhagan bhujbal says in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.