Pune Rain: पुणे, बारामतीवर बारीक लक्ष; अजित पवारांशीही बोलले मुख्यमंत्री, मदतीची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 12:57 IST2019-09-26T12:56:49+5:302019-09-26T12:57:58+5:30
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरात मृत्यू झालेल्यांप्रती ट्विटरवरुन दु:खं व्यक्त केलं आहे

Pune Rain: पुणे, बारामतीवर बारीक लक्ष; अजित पवारांशीही बोलले मुख्यमंत्री, मदतीची ग्वाही
पुणे आणि बारामतीमध्ये पूरपरिस्थिती असताना मुख्यमंत्री आणि पालकमंत्री जागावाटपाच्या चर्चांसाठी दिल्लीला गेल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली असताना, आम्ही रात्रीपासून पूरपरिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. दिल्ली पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी पुणे अन् बारामतीमधील पूरस्थितीच्या आढाव्याची माहिती दिली.
गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी रात्री शहरात झालेल्या पावसाने उच्चांक गाठला. रात्री 8 च्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. शहरातील सर्वच भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरात अतिवृष्टी होत असल्याने तसेच आपत्कालीन परिस्तिथी निर्माण झाली असल्याने पुणे जिह्यातील 5 तालुक्यांच्या शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.
तर प्रचंड पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीमधील दहा जणांचा मृत्यू झाला. यातील पाच मृतदेह मिळून आले असून, अन्य मृतदेहांचा शोध घेण्याचे काम एनडीआरएफच्या तीन पथकांकडून सुरू होते. टांगेवाले कॉलनी ही टांगे चालवणाऱ्यांची कॉलनी आहे. ही कॉलनी नेमकी नाल्याला खेटून आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यावर नाल्याचे पाणी वाढले. अक्षरशः रौद्र रूपाने वाहणारे पाणी कॉलनीतील घरांमध्ये घुसले. भिंती खचल्याने येथील काही घरे पडली. अंगावर भिंती पडल्याने काही जणांच्या मृत्यू झाला. तर काही जण प्रवाहासोबत वाहून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरात मृत्यू झालेल्यांप्रती ट्विटरवरुन दु:खं व्यक्त केलं आहे. राज्य सरकार संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. पुणे आणि बारामतीला एनडीआरएफ टीम रवाना केल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, बारामतीमध्ये 15 हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मी प्रशासनाशी बोललोय, बारामतीचे आमदार अजित पवार यांच्याशीही फोनवरुन संपर्क केलाय. प्रशासनाची तात्काळ मदत मिळेल, अशीही चर्चा त्यांच्यासोबत केल्याचं फडणवीस यांनी सांगितलंयं.