"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 17:41 IST2025-07-14T17:36:26+5:302025-07-14T17:41:31+5:30

Public Safety Act: सरकारने जनसुरक्षा कायदा मंजूर करून घेतला असला तरी काँग्रेसचा विरोध कायम असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या काळ्या कायद्याची होळी केली जाईल, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

"Public Safety Act for the benefit of the government and industrialists, Congress will celebrate it in every district", Harshvardhan Sapkal's announcement | "सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

मुंबई - अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. हा कायदा आतून बाहेरून काळा असून, सामान्यांची गळचेपी करणारा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच त्याला विरोध आहे. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर रेटून नेत कायदा मंजूर करून घेतलेला आहे. सरकारने कायदा मंजूर करून घेतला असला तरी काँग्रेसचा विरोध कायम असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या काळ्या कायद्याची होळी केली जाईल, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, जनसुरक्षा कायद्यामागचा हेतूच मुळात काळा आहे. या कायद्याचा फायदा फक्त सरकार व सरकार धार्जिणे उद्योगपती यानांच होणार आहे. धारावीचा भूखंड गिळंकृत करणारे, गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागडचे खनिज संपत्ती लाटणारे व शक्तीपीठ मार्गाचा रेड कार्पेट ज्यांना हवा आहे त्या उद्योगपतींना त्याचा फायदा होणार आहे. याला विरोध करणारे गडचिरोलीतील पर्यावरणवादी, आदिवासी, धारावीतील लोक, शक्तीपीठला विरोध करणारे शेतकरी यांनी मात्र विरोध केला तर त्यांना जेलमध्ये टाकले जाणार आहे, त्यांची संपत्ती जप्त केली जाणार आहे. सरकारचे फक्त कौतुक करा नाहीतर गप्प बसा आणि विरोधात बोलाल तर जनसुरक्षा कायद्याचा बडगा उभारून तुम्हाला गप्प करू हाच यामागचा हेतू आहे.

संविधानाचा विचार मांडणे, शिव, शाहू, फुले,आंबेडकरांचा विचार मांडणे, महात्मा गांधी, तुकडोजी महाराज यांचा विचार मांडणे हा नक्षलवाद आहे का? याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा. हा जर नक्षलवादी विचार असेल तर तो मी मांडत राहणार, मला अटक करायची तर फडणवीस यांनी खुशाल करावे असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे. डावी विचारसरणी विष पेरणारी आहे हे जर फडणवीस म्हणत असतील तर संघाच्या शाखेत कोणते विष पेरले जाते हे आम्ही सांगू असेही सपकाळ म्हणाले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मुलनासाठी काम केले त्यांची हत्या करण्यात आली. बहुजनांना शहाणे करणारे लेखण करणारे कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी यांचीही हत्या केली. यामागे जी शक्ती आहे तीच शक्ती संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्यामागे आहे असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Web Title: "Public Safety Act for the benefit of the government and industrialists, Congress will celebrate it in every district", Harshvardhan Sapkal's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.