समीर देशपांडेकोल्हापूर : शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिले मंजूर करून घेण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. यातूनच अनेक गैरप्रथाही रुजल्या आहेत. या सगळ्याला फाटा देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘महाकर्मी’ वेबपोर्टलची निर्मिती केली असून याद्वारे ऑनलाइन पद्धतीने ही बिले मंजूर होणार आहेत. पुढील आठवड्यात ही प्रक्रिया कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.सध्या प्रत्येक जिल्ह्यात तेथील जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यपद्धतीनुसार वैद्यकीय बिलांच्या मंजुरीची प्रक्रिया पार पाडली जाते. यातूनच कोल्हापूर जिल्ह्यात अशी बिले मंजूर करण्यासाठी पैसे घेतलेल्या आणि दिलेल्या नोंदींची वहीच डिसेंबर २०२५ रोजी सापडली होती आणि हा प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनातही गेला होता. हे प्रकरण गांभीर्याने घेत मंत्री प्रकाश आबिटकर यांनी ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठीच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार आता वेबपोर्टल, ॲप विकसित करण्यात आले आहे.हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली नोंदणी करावयाची आहे. आता जशी बिलाची फाइल तयार होते तशीच पीडीएफ फाइल तयार करून ती अपलोड करावयाची आहे. ती जिल्हा शल्यचिकित्सकांच्या लॉगिनला जाईल. ती स्वीकारल्याचा, त्रुटींचा, मंजुरीचा ३० दिवसांत मेसेज संबंधित कर्मचाऱ्याला येईल. ३० दिवसांत फाइल मंजूर झाली नाही किंवा उत्तर आले नाही तर ती थेट आरोग्य उपसंचालकांकडे जाईल. मंंजूर झालेला प्रस्ताव प्रिंट काढून संबंधित कर्मचारी आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे जमा करेल आणि निधी उपलब्धतेनुसार त्याला बिलाची रक्कम मिळेल, अशी ही प्रक्रिया आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांच्या मंजुरीच्या कामांबाबत अनेक तक्रारी येत होत्या. कर्मचाऱ्यांच्या हक्काचे वैद्यकीय बिल मिळवतानाही त्याला अनेकदा हेलपाटे मारावे लागत होते. यातूनच काही ठिकाणी गैरकारभार झाल्याच्या तक्रारी झाल्या. म्हणूनच कायमस्वरूपी उपाय म्हणून ही ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जी शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा देईल. - प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री
Web Summary : Maharashtra's Public Health Department introduces 'Mahakarmi' web portal for online medical bill approvals, eliminating hassles for government employees. The app streamlines the process, ensuring transparency and faster reimbursements, expected to be operational next week.
Web Summary : महाराष्ट्र का लोक स्वास्थ्य विभाग सरकारी कर्मचारियों के लिए चिकित्सा बिलों को ऑनलाइन मंजूरी देने के लिए 'महाकर्मी' वेब पोर्टल शुरू कर रहा है, जिससे परेशानी कम होगी। ऐप प्रक्रिया को सुव्यवस्थित करता है, पारदर्शिता और तेजी से प्रतिपूर्ति सुनिश्चित करता है, जो अगले सप्ताह तक चालू होने की उम्मीद है।