१६ वनस्थानकांच्या बांधकामासाठी सव्वा कोटीच्या निधीची तरतूद
By Admin | Updated: February 1, 2015 02:16 IST2015-02-01T02:16:29+5:302015-02-01T02:16:29+5:30
वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी शासनाने पुढाकार घेतला असून राज्यातील १० जिल्ह्णांतील १६ वनसंरक्षण कुटीच्या बांधकामासाठी १ कोटी २३ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

१६ वनस्थानकांच्या बांधकामासाठी सव्वा कोटीच्या निधीची तरतूद
खामगाव (जि. बुलडाणा) : वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी शासनाने पुढाकार घेतला असून राज्यातील १० जिल्ह्णांतील १६ वनसंरक्षण कुटीच्या बांधकामासाठी १ कोटी २३ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या वनकुटीच्या माध्यमातून वनातील तस्करी आणि इतर गोष्टींना आळा घालण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत.
गेल्या काही दिवसांत वनातील साधनसंपत्तीची चोरी आणि इतर अवैध व्यवहार वाढीस लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. या सर्व प्रकारांची दखल घेऊन मुख्य वनसंरक्षक यांनी राज्यातील १० जिल्ह्णातील १६ वनस्थानकांच्या बांधकामासाठी निधी मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. त्यानुसार सन २०१४-१५ या आर्थिक वर्षांसाठी राज्य शासनाने ३० जानेवारी २०१५ च्या शासन निर्णयानुसार या योजनेसाठी १२३.७२ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीत केला आहे.
या निधीच्या माध्यमातून वनक्षेत्र संरक्षणासोबतच अवैध वृक्षतोड, अवैध मालाची बेकायदेशीर वाहतूक, वन्यजीवांची अवैध शिकार, व्यापार यासोबतच वनातील साधन संपत्तीचा बेकायदेशीर वापर, वनातील घडणाऱ्या अवैध बाबीवर नियत्रंण तसेच आगीच्या वणव्यावर नियंत्रण ठेवणे, अवैध चराई, अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन संरक्षण कुटीचे बांधकाम आणि त्या कुटीजवळ बोअरवेल आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत़
या जिल्ह्यांना मिळणार निधी
शासनाने अर्थसंकल्पीत केल्या जाणाऱ्या रक्कमेतून अमरावती, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे, यवतमाळ या विभागात वनसंरक्षण कुटी उभारल्या जाणार असल्याची माहिती आहे.