बीड प्रकरणात दबाव, अजित पवारांकडे राजीनामा सोपवला?; चर्चेवर धनंजय मुंडेंचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:36 IST2025-01-07T12:35:50+5:302025-01-07T12:36:20+5:30
धनंजय मुंडे यांनी पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगत होती.

बीड प्रकरणात दबाव, अजित पवारांकडे राजीनामा सोपवला?; चर्चेवर धनंजय मुंडेंचा खुलासा
NCP Dhananjay Munde: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगत होती. मात्र मी राजीनामा दिला नसल्याचा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे.
धनंजय मुंडे हे आज बैठकीसाठी मंत्रालयात पोहोचले होते. यावेळी पत्रकारांकडून राजीनाम्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, "मी कुठलाही राजीनामा दिलेला नाही." त्यामुळे तूर्तास तरी बीड प्रकरणात अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना अभय दिल्याचं दिसत आहे.
बीडमधील हत्या आणि खंडणी प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर काल धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडी करत आहे. तसेच न्यायालयीन चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये जो कोण दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल," असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. रात्री त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चाही केली.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. हत्येत सहभागी असलेल्या सहआरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करणारे निवेदन सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सोमवारी दिले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार सुरेश धस, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे आदी उपस्थित होते.
देशमुख प्रकरण हे बीडमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदाहरण आहे. पोलिसांचा निष्काळजीपणा व पक्षपातीपणामुळे बीड जिल्ह्यात अशांतता पसरली आहे. राज्यभरातील सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. देशमुख प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली. परंतु मुख्य गुन्हेगार वाल्मीक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. देशमुख प्रकरण दडपण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला.