Pravin Darekar : "महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, केवळ ठाकरे सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार" , महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रविण दरेकरांचा हल्लाबोल! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 04:07 PM2021-09-12T16:07:07+5:302021-09-12T16:12:11+5:30

Pravin Darekar : सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी जर तुमच्या राज्यात महिला सुरक्षित नसतील, तर एकदिवस देखील हे सरकार जनता ठेवणार नाही, असा इशारा देखील प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला.

Pravin Darekar attack state government on the issue of women's security! | Pravin Darekar : "महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, केवळ ठाकरे सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार" , महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रविण दरेकरांचा हल्लाबोल! 

Pravin Darekar : "महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, केवळ ठाकरे सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार" , महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रविण दरेकरांचा हल्लाबोल! 

Next

मुंबई : पश्चिम उपनगरात  साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकाराने समाजमन हादरुन गेले आहे. एका विकृत परप्रांतीयाने ३२ वर्षाच्या  महिलेवर पाशवी बलात्कार करीत निर्दयपणे मारहाण करून तिची हत्या केली. गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने जबर जखमी झालेल्या अबलेची रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली झुंज सुमारे ३३ तासांनंतर अपयशी ठरली. यावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून याला केवळ सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे. यांना फक्त आपली खुर्ची सुरक्षित कशी ठेवता येईल याचीच काळजी लागून आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यात हे सपशेल अपयशी ठरले आहे. अशी टीका प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर केली आहे. तसेच, मुंबईत बलात्कार झालेल्या महिलेचा प्रश्न ऐरणीवर आहे. मुंबईमधील महिला आज भयभीत आहेत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर अनेक लोक राहत असून सुरक्षित होते. आज त्या प्रतिमेला तडा लागला आहे. त्यांना सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. कारण, मागील काही दिवसात मोठ्याप्रमाणावर अशा प्रकारच्या संख्या घडल्या आहेत. पुन्हा पुन्हा अशा घटना घडत आहेत, याचा अर्थ सरकारचे लक्ष नाही. पोलिसांवर नियंत्रण नाही. पोलिसांना योग्य मार्गदर्शन नाही, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

याचबरोबर, तुमचा प्राधान्यक्रम बदलला आहे. तुमचा प्राधान्यक्रम बदल्या, वाझे सारख्या प्रवृत्तींना पाठीशी घालणे. म्हणून आज आपलं स्कॉटलंडच्या तुलनेत असलेला पोलीस विभाग सरकारच्या नाकर्तेपणामुळे बदनाम होत आहे. पोलीस सक्षम आहेत. हिंमतबाज आहेत परंतु जसा राजा तशी प्रजा, तसेच जसे सरकार तसे पोलीस खातं आणि त्याचा प्रत्यय तर आज अशा भयानक घटनामधून दिसत आहे, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले. याशिवाय, तुमचे केवळ सरकार हेच प्राधान्य आहे का? शेवटी सरकार कशासाठी असते. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी, जर तुमच्या राज्यात महिला सुरक्षित नसतील, तर एकदिवस देखील हे सरकार जनता ठेवणार नाही, असा इशारा देखील प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला.

दरम्यान, साकीनाका घटनेतील विकृत नराधमाला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेला लवकर न्याय मिळावा यासाठी मुंबई भाजपा महिला मोर्चाच्यावतीने पवई पोलिस स्टेशनच्या बाहेर काढण्यात आलेल्या निदर्शन मोर्चाला प्रविण दरेकर यांनी भेट दिली. तसेच, पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी मदार मनीषाताई चौधरी, मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा-नगरसेविका शितल गंभीर, नगरसेवक जिल्हाध्यक्ष सुशम सावंत, यतीम देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
 

Web Title: Pravin Darekar attack state government on the issue of women's security!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.