"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 21:11 IST2025-05-05T21:10:54+5:302025-05-05T21:11:34+5:30
Praniti Shinde vs BJP: "इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला होता, मोदीजी कसली वाट पाहत आहेत?"

"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
Praniti Shinde vs BJP: जून २०२२ पासून राज्याचे राजकारण पूर्णपणे बदलले. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ते पक्ष भाजपासोबत गेले आणि महायुतीचे सरकार स्थापन झाले. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीने जोरदार विजय मिळवला. त्यानंतर आता भाजपाकडून काँग्रेस पक्ष फोडण्याची तयारी सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना, काँग्रेसला फोडा आणि काँग्रेस रिकामी करा, असा सल्ला दिला. काँग्रेसमधून कोणी आलं तरी तुमचा विचार अगोदर केला जाईल, असेही बावनकुळेंनी सांगितले. या मुद्द्यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमकपणे उत्तर दिले.
महायुतीत ‘तीन तिघाडा, काम बिघाडा'!
"पहलगामला अतिरेकी हल्ला झाला, तेव्हा राहुल गांधी पहलगामला गेले. त्यांनी हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारला प्रचारसभा घ्यायला गेले. इंदिरा गांधी यांनी धाडस करून पाकिस्तानला धडा शिकवला, मग नरेंद्र मोदी कशाची वाट पाहत आहेत? भाजपा काँग्रेसला कमकुवत करण्याची भाषा करत आहे. पण काँग्रेस कमकुवत होणार नाही. उलट महायुतीच 'तीन तिघाडा, काम बिघाडा' अशी स्थिती झाली आहे.
संविधान वाचले तर सद्भाव कायम राहिल!
"भाजपा व संघ जाती धर्मात वाद निर्माण करत तोडण्याचे काम करत आहे, तर काँग्रेस जोडण्याचे काम करत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता राहुल गांधी यांनी देशभर पदयात्रा काढली. देशावर संकट येते, सामाजिक सौहार्द बिघडते तेव्हा सर्वात आधी काँग्रेस पक्ष समोर येतो. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली, पण भाजपा युती सरकारवर त्याचा काही फरक पडला नाही. राहुल गांधी यांनी परभणीत येऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आज देशात संविधान व लोकशाही वाचवण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. संविधान वाचले तर सद्भाव कायम राहिल, संविधान वाचले तर सर्व जाती धर्माला न्याय मिळेल, असे मत माजी मंत्री नसीम खान यांनी मांडले.
भाजपाला संविधान बदलून मनुवाद आणायचाय!
"भाजपा देशात अराजक माजवण्याचे काम करत आहे. भाजपा सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरली असल्याने जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी जाती-धर्मात भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात पवित्र संविधान दिले, सर्वांना समान अधिकार, हक्क दिले आहेत. पण भाजपाला हे संविधान बदलायचे आहे आणि मनुवाद आणायचा आहे," असा घणाघाती आरोप खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी यावेळी केला.