Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:34 IST2025-12-29T16:31:11+5:302025-12-29T16:34:14+5:30
Prakash Mahajan On BJP: शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रकाश महाजन यांनी भाजपवर बोचरी टीका करत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.

Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी आज अधिकृतपणे शिंदेसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर त्यांनी भाजपवर बोचरी टीका करत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. "भाजपच्या घराला दार नाही, पण पहारेकरी आहेत," अशा शब्दांत त्यांनी पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.
प्रकाश महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश न करण्यामागचे कारण सांगताना आपली व्यथा मांडली. ते म्हणाले की, "मी भाजपमध्ये गेलो नाही कारण त्यांनी मला तब्बल तीन महिने ताटकळत ठेवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्यांनी आजवर भाजपवर कडाडून टीका केली, त्यांना पक्षात सन्मानाने घेतले जात आहे, पण माझ्यासारख्या व्यक्तीला प्रतीक्षा करावी लागली."
भाजपमधील जुन्या योगदानाबद्दल बोलताना प्रकाश महाजन भावूक झाले. "मला असे वाटते की, आजच्या भाजपला महाजन किंवा मुंडे कुटुंबाची गरज उरलेली नाही. मी वर्षापूर्वीच बाहेर पडलो आहे. सध्या भाजपमध्ये प्रमोद महाजन यांचा एक अंश शिल्लक आहे, त्यांच्याकडे तरी भाजपने नीट लक्ष दिले तर समाधान वाटेल," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नाशिकच्याराजकारणाचा संदर्भ देत त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. "ज्या दिनकर पाटलांनी माझ्या उपस्थितीत गिरीश महाजन यांचे जाहीर वस्त्रहरण केले, त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर शब्द वापरले, आज तेच दिनकर पाटील भाजपमध्ये आहेत. हे पाहून आश्चर्य वाटते," असे म्हणत त्यांनी भाजपच्या सध्याच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.