“अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावे, वंचितसोबत आल्यास...”; प्रकाश आंबेडकरांची मोठी ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 18:11 IST2024-07-16T18:07:42+5:302024-07-16T18:11:04+5:30
Prakash Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीसोबत मैत्री करावी. अजित पवारांचे राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

“अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावे, वंचितसोबत आल्यास...”; प्रकाश आंबेडकरांची मोठी ऑफर
Prakash Ambedkar News: राजकीय पक्षांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संवेदनशील विषयावर बोलायला हवे. दंगल होईपर्यंत वाट पाहू नये. सध्याची परिस्थिती स्फोटक आहे. एवढेच सांगतो. तोडगा काढणारे राजकीय पक्ष आहेत. विधानसभा निवडणुकाही जवळ आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपली पोळी भाजण्याचे काम करत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, एनसीपी, काँग्रेस आणि ठाकरे गट आणि भाजप हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहे. म्हणून ते भूमिका टाळत आहेत. राजकीय पक्षांनी भूमिका घेतल्या तर लोकांसमोर परिस्थिती जाते. जे पक्ष भूमिका घेत नाहीत, ते आपल्या बाजूने नाही असे ओबीसींचे मत होत आहे. हे सर्व लोक श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत, असे ओबीसींना वाटते आहे आणि हा धोका आहे, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला.
अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावे
प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी पक्षासोबत मैत्री करण्याची ऑफर दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही नेहमीचा मार्ग अवलंबला आहे. आम्ही स्वबळावर लढणार आहोत. अजित पवारांचा गट ते आम्हाला वापरत आहेत, असे म्हणत आहे. वंचितकडे जातो असे सांगत आहेत. आम्हाला थांबवायचे असेल तर सीट वाढवा असे सांगत आहे. अजित पवार यांनी बाहेर पडावे. त्यांचे राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो, असे मोठे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यात येत्या २५ जुलैपासून ओबीसी, एससी आणि एसटी यांच्या हक्कांसाठी आरक्षण बचाव यात्रा काढण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ही यात्रा दादर चैत्यभूमीपासून निघणार असून संभाजीनगर येथे यात्रेची सांगता होणार आहे.