“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 19:19 IST2025-12-13T19:18:49+5:302025-12-13T19:19:34+5:30
Prakash Ambedkar News: एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासारख्या माणसाला खिशात घातले आहे. एकनाथ शिंदे यांनी आपली पॉवर दाखवून दिली. हीच त्यांची किमया आहे.

“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Prakash Ambedkar News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत सगळे काही आलबेल नसल्याचे दावे केले जात होते. अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात लढले होते. भाजपा आणि शिवेसना शिंदे गटाचे नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर महापालिका निवडणुका भाजपा आणि शिंदे गटाने महापालिका निवडणूक एकत्र लढण्याबाबत चर्चा केली. यातच आता येत्या दोन महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, असे वाटत असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतःची पॉवर काय आहे हे दाखवून दिले आहे. आगामी राज्यभरातील महापालिका आम्ही वेगळे लढणार असे भाजपा सांगत होती, पण आता त्यांना माघार घ्यावी लागणार आहे. युती करून लढू असे ते आता म्हणत आहेत. एकनाथ शिंदे हे अमित शाह यांना भेटले. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना खिशात घातले आहे. ही त्यांची किमया आहे. त्यामुळे आता सर्व महापालिकांच्या निवडणुका शिवसेना शिंदे गट आणि भाजपा एकत्र लढणार आहेत. विधानसभेची निवडणूक झाली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले नाही, त्याचा हा बदला असावा असं त्यावरून दिसत आहे. एकनाथ शिंदे येत्या महिना दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील असे वाटत आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
शरद पवार हे चाणक्य आहेत
शरद पवार चाणक्य आहेत. काही काळापूर्वी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आणि एकनाथ शिंदे यांनी योग्य संदेश दिला. मला हे आणि असेच दिसत आहे की, एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासारख्या माणसाला खिशात घातले आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच खेळ आता सुरू झाला आहे. NDA मध्ये अजून काही होणार का हे पाहू आणि मग कुठे जायचे ते ठरवू, असे सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले.
दरम्यान, युती करूनच महापालिका निवडणुका आम्ही लढणार आहोत. नगरपालिका निवडणुकीत आम्ही युती करून लढलो आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आम्ही युती करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तसेच संख्या नाही, म्हणून विरोधी पद दिले गेले नाही. भाजपाने औचित्य दाखवायला हवे होत की, सिंगल लार्जेस्ट पार्टीचा अध्यक्ष द्यायला हवा होता. सगळ्यांनी बसून एक नाव सुचवायला हवे होते पण तसे झाले नाही. दुर्दैवाने त्यांना म्हणजे भाजपाला अस करायचे नव्हते, असा आरोप आंबेडकर यांनी केला.