सांगलीतील प्रजितची झेप एलॉन मस्कच्या कंपनीत, एसटी महामंडळाच्या शिक्षण अग्रीम योजनेचा झाला लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:28 IST2025-12-26T13:26:48+5:302025-12-26T13:28:52+5:30
कुटुंबासह सांगली जिल्ह्याचे नाव उंचावले, प्रजित कार्यरत आहे ती कंपनी स्पेस एक्स या खासगी अंतराळात यान पाठविणाऱ्या कंपनीला व इलेक्ट्रिक वाहनांना लागणाऱ्या बॅटरीचे उत्पादन करते

सांगलीतील प्रजितची झेप एलॉन मस्कच्या कंपनीत, एसटी महामंडळाच्या शिक्षण अग्रीम योजनेचा झाला लाभ
प्रसाद माळी
सांगली : ‘ शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षणाने सामान्य माणूस काहीही साध्य करू शकतो ’, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. एसटीच्या पलूस आगारातील वाहक अशोक कदम यांचा मुलगा प्रजितच्या यशाने याची प्रचिती दिली. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन एलॉन मस्क यांच्या कंपनीत तो नुकताच रूजू झाला आहे. अमेरिकेतील शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याला एसटी महामंडळाच्या परदेशी शिक्षण अग्रीम योजनेचा लाभ झाला.
प्रजित कदमने ‘एम.एस.’चे शिक्षण पूर्ण केल्यावर तीन महिन्यांपूर्वी कॅलिफोर्निया येथील एलॉन मस्क यांच्या कंपनीत रूजू झाला आहे. प्रजित ज्या कंपनी कार्यरत आहे ती कंपनी मस्क यांच्या स्पेस एक्स या खासगी अंतराळात यान पाठविणाऱ्या कंपनीला व इलेक्ट्रिक वाहनांना लागणाऱ्या बॅटरीचे उत्पादन करते. या कंपनीमध्ये तो केमिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. प्रजित याने त्याची केमिकल इंजिनिअरिंगची डिग्री कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयातून घेतली आहे. तसेच पुढील मास्टर ऑफ सायन्स या पदव्युत्तर शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला हाेता.
प्रजितचे वडील अशोक कदम हे मूळचे रेठरेहरणाक्षचे (ता. वाळवा) येथील असून, शेतकरी कुटुंबातील आहेत. ते एसटीच्या पलूस डेपोत वाहक म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत कष्टाने त्यांनी प्रजितचे उच्च शिक्षण पूर्ण केले. प्रजितला अमेरिकेला पाठविण्यासाठी एसटी महामंडळाच्या परदेशी शिक्षण अग्रीम योजनेचा लाभ घेतला. या योजनेतून त्याला १० लाखाचे अर्थसहाय्य मिळाले होते. प्रजितने ही हुशारी आणि जिद्दीच्या जोरावर एलॉन मस्क यांच्या कंपनीत नोकरी मिळवत कुटुंबासह सांगली जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
ईश्वरपूर डेपोतील सहायकाचा मुलगा रशियात
ईश्वरपूर डेपोतील सहायक पदावर कार्यरत असणारे सतीश कोळी यांनी त्यांचा मुलगा प्रणव याला ‘एमबीबीएस’ साठी रशियाला पाठवले आहे. त्याला एसटीने ९ लाखाचे अर्थसहाय्य केले आहे.
एसटीची परदेशी शिक्षण अग्रीम योजना
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांना परदेशात शिक्षण घेता यावे, यासाठी परदेशी शिक्षण अग्रीम योजना २०२३ पासून लागू केली आहे. याचा लाभ घेत एसटी कर्मचाऱ्यांची मुले परदेशात शिक्षण घेऊन स्वत:ची व आपल्या कुटुंबाची प्रगती साधत आहेत.
परदेशी शिक्षण अग्रीम योजनेतून कर्मचाऱ्यांच्या मुलांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी आगाऊ दहा लाखांपर्यंतची रक्कम दिली जाते. ती रक्कम १२० महिन्यात हप्त्याने फेडून घेतली जाते. या रकमेवर कोणतेही व्याज आकारले जात नाही. यामुळे परदेशी शिक्षण घेण्याचे स्वप्न एसटी कर्मचाऱ्यांची मुले पूर्ण करू शकतात. - सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन, सांगली