मुंबई : राज्यातील २७ हजार ग्रामपंचायतींचा कारभार आॅनलाइन ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या संगणक परिचालकांनी (डाटा आॅपरेटर) थकीत मानधन आणि कायम सेवेत घेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राणी बाग ते आझाद मैदान धडक मोर्चा काढलेल्या महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने सायंकाळी उशिरापर्यंत आझाद मैदानाचा ताबा घेतला होता.दरम्यान, हजारोंच्या संख्येने मैदानावर धडकलेल्या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या वेळी आझाद मैदान पोलिसांमार्फत मुख्यमंत्री कार्यालयातून संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावण्यात आले. मात्र दस्तुरखुद्द मुख्यमंत्री कार्यालयाची भेट संघटनेने नाकारली. याआधी नागपूर येथील अधिवेशनात आणि आझाद मैदानात केलेल्या उपोषणांत संघटनेला आश्वस्त करण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर येऊन भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीवर कारवाई करून परिचालकांना न्याय मिळवून देण्याची हमी द्यावी अन्यथा रात्रभर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.आझाद मैदानात येणाऱ्या आंदोलकांना सायंकाळी ६ वाजता मैदानाचा ताबा सोडावा लागतो. मात्र संघटनेने मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आझाद मैदानाचा ताबा सोडणार नसल्याची भूमिका घेतली.
डाटा एन्ट्री आॅपरेटर्सचे शक्तिप्रदर्शन
By admin | Updated: April 1, 2015 03:10 IST