वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया रेंगाळली; विद्यार्थी, पालक संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:33 IST2025-10-16T12:32:45+5:302025-10-16T12:33:03+5:30
निकाल लागून दोन महिने उलटले

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया रेंगाळली; विद्यार्थी, पालक संतप्त
सांगली : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक ‘नीट पीजी-२०२५’चा निकाल लागून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांतून संताप व्यक्त होत आहे.
नीट पीजी २०२५ची परीक्षा ३ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडली. यावर्षी प्रथमच एका शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली. १९ ऑगस्ट २०२५ रोजी निकाल जाहीर झाला होता. या परीक्षेच्या निकालाआधारे वैद्यकीय पदवीधारकांना एम. डी., एम. एस., डी. एन. बी. (६ वर्षांचा अभ्यासक्रम) आणि पीजी डिप्लोमा यांसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.
यावर्षी २ लाख ४२ हजार ६७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी २ लाख ३० हजार ११४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. प्रवेश प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.
प्रवेश शुल्क जाहीर नाही
अनेक महाविद्यालयांनी अद्याप प्रवेश शुल्क जाहीर केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालकांत संभ्रमावस्था आहे. प्रवेशाचे गणित आखताना अनेक अडचणी त्यांच्यासमोर निर्माण झाल्या आहेत.