Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 09:16 IST2025-11-19T09:13:50+5:302025-11-19T09:16:28+5:30
BJP vs Shinde Sena: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय साम्राज्य असलेल्या ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांच्या महापालिका निवडणुकीत त्यांना हादरा देण्याकरिता भाजपने कंबर कसल्याने शिंदेसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली.

Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
संदीप प्रधान
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय साम्राज्य असलेल्या ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांच्या महापालिका निवडणुकीत त्यांना हादरा देण्याकरिता भाजपने कंबर कसल्याने शिंदेसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदेसेनेने नीलेश राणे यांच्या माध्यमातून तळकोकणात अगोदर भाजपचे आठ नगरसेवक फोडल्याने भाजपने शिंदेसेनेला दणका दिल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा संघर्ष तीव्र झाला तर विरोधक दूर राहिले सत्ताधारी महायुतीमधील कार्यकर्ते परस्परांना भिडल्याचे चित्र दिसू शकते.
मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला शिंदेसेनेसोबत युती करायची आहे. शिंदे यांनी उद्धवसेनेतील ६२ ते ६४ माजी नगरसेवक पक्षात घेतले असून, तेथे ते बऱ्याच जागांची मागणी करु शकतात. तसे त्यांनी करू नये याकरिता शिंदे यांचे नाक दाबण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक व आ. संजय केळकर यांनी ठाण्यातून सुरुवात केली. या दोघांनी स्वबळाची गर्जना केली. भाजपला ठाण्यात धक्का देण्यासाठी कळवा-मुंब्र्यातील आ. जितेंद्र आव्हाड समर्थक सात माजी नगरसेवक भाजपसोबत पक्षप्रवेशाच्या वाटाघाटी करत असताना शिंदे यांनी त्यांना पक्षात घेतले. यामुळे भाजप अधिकच बिथरली. भाजपने शिंदेसेनेचे मंत्री व आमदार यांच्या मतदारसंघात विरोधकांना बळ दिले. तिकडे तळकोकणात नारायण राणे यांचे एक पुत्र नितेश राणे भाजपची धुरा सांभाळत आहेत, तर दुसरे पुत्र नीलेश हे शिंदेसेनेची पालखी वाहताहेत. नीलेश यांनी भाजपच्या आठ नगरसेवकांना शिंदेसेनेत प्रवेश दिल्यावर भाजपचा तिळपापड झाला.
महापौरपदासाठी दोघांचीही फिल्डींग
इकडे अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीतही खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजपच्या काही माजी सदस्यांना शिंदेसेनेत प्रवेश दिला. उल्हासनगरात ओमी कलानींशी हातमिळवणी करून भाजपने महापौर बसवला होता. आता भाजपला संधी नको म्हणून शिंदेसेनेने ओमी कलानी, साई पक्ष व छोट्या पक्षांची त मोट बांधली. भाजपचे जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामनी, प्रकाश माखीजा, राम चार्ली पारवानी यांनी कलानी गटात तर माजी नगरसेविका मीना सोंडे, किशोर वनवारी यांनी शिंदे गटात प्रवेश घेतल्याने, शहर भाजपला मोठे खिंडार पडले.
नाराजांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीसाठी प्रयत्न
शिंदेसेनेच्या कारवायांमुळे बिथरलेल्या भाजपने शिंदेसेनेत प्रवेशाकरिता वाटाघाटी करीत असलेले दीपेश म्हात्रे यांना उद्धवसेनेतून भाजपमध्ये आणले. यामुळे अंगाची लाही लाही झालेल्या शिंदेसेनेने लागलीच भाजपमध्ये गेले काही दिवस नाराज असलेल्या माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांचा प्रवेश घडवून आणला. खोणीच्या सरपंचपदी उद्धवसेनेच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्याने व कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या महेश पाटील यांना भाजपने गळाला लावले. त्यांची बहिणी सुनीता पाटील, सायली विचारे व संजय विचारे यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.