कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 19:07 IST2020-04-01T18:06:54+5:302020-04-01T19:07:04+5:30
समाज आणि प्रशासन यामधील महत्त्वाचा दुवा असलेल्या पोलिस पाटलांनाही विमा कवच मिळण्याची नितांत गरज आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील
मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आरोग्य क्षेत्रात आघाडीवर असलेले देशही या महामारीसमोर हतबल झालेले दिसत आहे. अशा स्थितीत आरोग्य यंत्रणा आणि त्याला समांतर असणाऱ्या पोलिस, शासकीय, निमशासकीय यंत्रणा आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे. यापैकी या यंत्रणातील कर्मचाऱ्यांना सरकारकडून विमाकवच देण्यात आले आहे. तसे विमाकवच गावपातळीवर लढा देणाऱ्या पोलिस पाटलांना देखील मिळावे, अशी मागणी माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे.
मोहिते-पाटील यांनी अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या शासकीय, निमशासकीय व सामाजिक पातळीवरील सर्वच घटक आपले कर्तव्य सक्षमपणाने निभावण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. यामध्ये गाव पातळीवरील पोलीस पाटील हा घटकही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय, निम शासकीय व कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या अनेक घटकांना शासनाने विमा कवच दिले आहे. त्याप्रमाणे समाज आणि प्रशासन यामधील महत्त्वाचा दुवा असलेल्या पोलिस पाटलांनाही विमाकवच मिळण्याची नितांत गरज आहे. यासाठी आपण आपल्या स्तरावर प्रयत्न करून पोलीस पाटलांना विमाकवच मिळवून द्यावे अशी विनंकी मोहिते पाटील यांनी फडणवीसांकडे केली आहे.