बेबी प्रकरणाकडे पोलीस दलाचे लक्ष

By Admin | Updated: June 1, 2015 05:03 IST2015-06-01T05:03:17+5:302015-06-01T05:03:17+5:30

ड्रग माफीया बेबी पाटणकर प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी एकमेकांविरोधात केलेल्या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे आजघडीला संपूर्ण पोलीस दलाचे

Police attention to baby case | बेबी प्रकरणाकडे पोलीस दलाचे लक्ष

बेबी प्रकरणाकडे पोलीस दलाचे लक्ष

मुंबई : ड्रग माफीया बेबी पाटणकर प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी एकमेकांविरोधात केलेल्या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे आजघडीला संपूर्ण पोलीस दलाचे लक्ष कोण खरे, कोण खोटे याकडे लागले आहे. या प्रकरणात अटक झालेल्या अंमलीपदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ निरिक्षक सुहास गोखले यांनी मी लढणार, अशी भुमिका घेतल्याने तर पोलीस दलात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
बेबीने प्रियकर व साथीदार बडतर्फ पोलीस शिपाई धर्मराज काळोखेला पोलिसांच्या तावडीत देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने निलंबीत पोलीस निरिक्षक गौतम गायकवाड, पोलीस शिपाई यशवंत पार्टे यांच्याकरवी गोखलेंना काळोखेची माहिती पुरवली होती. पुढे काळोखेला सातारा पोलिसांनी अटक केली आणि त्यात बेबीचे नाव पुढे आले. फरार असताना बेबीने स्वत: गोखलेंना फोन केले. याच मुद्यावरून गोखले यांनी अमलीपदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त नामदेव चव्हाण व अप्पर आयुक्त के. एम.एम. प्रसन्ना यांच्यावर आरोपांची तोफ डागली. दोन्ही वेळेस उपलब्ध माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवली होती मात्र वरिष्ठांनी प्रतिक्रीया व्यक्त केली नाहीत. तर वरिष्ठांनी गोखलेंवर आरोप केले आहेत. वडिलांच्या निधनामुळे काळोखे गावी गेल्याचे गोखले यांनी सांगितले. प्रत्यक्षात त्याच्या वडिलांचे निधन होऊन बरेच महिने लोटले होते. बेबीबाबतची माहितीही गोखलेंनी चार दिवसांनंतर दिली.
याबाबत गुन्हे शाखेचे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांना विचारले असता तपासात ज्यांची नावे पुढे येतील त्यांची चौकशी होईल, हाती येणारी माहिती पडताळली जाईल, अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली. अद्याप गोखलेंसह अटक झालेल्या पाच आरोपी पोलिसांची चौकशी सुरू झालेली नाही. चौकशीत व त्यांनंतरच्या पडताळणीत सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असेही त्यांनी सांगितले.
पोलीस दलातही प्रत्येकाला वरिष्ठ अधिकारी खरे बोलतात की गोखले हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

Web Title: Police attention to baby case