"लोक म्हणाले, न्याय हवा असेल तर राज ठाकरेंना भेटा"; प्रिया फुके मुलासह 'शिवतीर्थ'वर पोहचल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:49 IST2025-07-09T12:47:42+5:302025-07-09T12:49:25+5:30
परिणय फुके हे साम, दाम, दंड भेद वापरून आम्हाला त्रास देत आहेत. आम्हाला आमचा हक्क द्यावा हीच आमची मागणी आहे असं त्यांनी सांगितले.

"लोक म्हणाले, न्याय हवा असेल तर राज ठाकरेंना भेटा"; प्रिया फुके मुलासह 'शिवतीर्थ'वर पोहचल्या
मुंबई - फुके यांच्या कौटुंबिक वादातून त्यांच्या सून प्रिया फुके न्याय मागण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहचल्या. काही दिवसांपूर्वी प्रिया फुके यांनी विधानभवनाबाहेर आंदोलन केले त्यानंतर पोलिसांनी २ मुलांसह त्यांना ताब्यात घेतले. आज प्रिया फुके त्यांच्या मुलासह दादरच्या शिवतीर्थवर दाखल झाल्या. साम,दाम दंड भेद वापरून भाजपा आमदार परिणय फुके यांच्याकडून आम्हाला त्रास दिला जात आहे असा आरोप प्रिया फुके यांनी केला असून लोकांनी न्याय हवा असेल तर राज ठाकरेंना भेटा, ते तुम्हाला न्याय मिळवून देतील असं मला सांगितले. त्यामुळे मी इथं त्यांच्या भेटीसाठी आल्याचे प्रिया फुके यांनी म्हटलं.
प्रिया फुके म्हणाल्या की, मी राजसाहेबांची भेटायला वेळ घेतली नाही. परंतु मला मदत करणाऱ्या सगळ्यांनी तुम्ही राज ठाकरेंकडे जा, ते तुम्हाला न्याय मिळवून देतील असं सांगितले. फार आशेने आज मी इथे आली आहे. परिणय फुके यांचे ऐकले तर हे न्यायालयीन प्रकरण आहे असं ते सांगतात. तुम्ही लोकनेते असताना घरातल्या महिलेला न्याय देऊ शकत नाही. सहा महिन्यात एक निकाल येणार होता परंतु परिणय फुके यांनी सगळे मॅनेज करून त्याला एक दीड वर्ष लावला. दीड वर्षांनी जेव्हा निकाल हाती आला तेव्हा सगळे अकाऊंट रिकामे होते. सासू-सुनेचे भांडण असते तर घरातच वाद संपला असता, परिणय फुके हे साम, दाम, दंड भेद वापरून आम्हाला त्रास देत आहेत. आम्हाला आमचा हक्क द्यावा हीच आमची मागणी आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच हा प्रश्न पुरुषी इगोवर आला आहे अन्यथा हा वाद सुटू शकतो. मला मुलांना घेऊन विधानभवनाबाहेर आंदोलन करावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी भेटीला वेळ मागितला परंतु ती मिळाली नाही. मी मोठ्या अपेक्षेने राज ठाकरे यांच्याकडे आली आहे. ते मला भेटतील आणि आमचे ऐकून न्याय मिळवून देतील. मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचे असतील परंतु माणुसकीसाठी एका स्त्रीला न्याय देण्यासाठी पुढे आले पाहिजे. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा असं प्रिया फुके यांनी म्हटलं.
"...म्हणून राज ठाकरेंकडे आले"
दरम्यान, जेव्हा मी इन्स्टाग्रामवर लाईव्ह आले, व्हिडिओ काढले आहेत. त्यात प्रत्येकाने मला हेच सांगितले, तुम्ही राजसाहेबांना भेटा, ते तुम्हाला न्याय मिळवून देतील. मी सगळ्यांच्या दारात उभी राहिली आहे. भाजपाच्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या दारी गेले परंतु मला न्याय मिळाला नाही. ही पक्षाची गोष्ट नाही. एका स्त्रीला कितपत तुम्ही मदत करू शकता ही गोष्ट आहे. मी विधानभवनाबाहेर गेले तिथे पोलिसांनी ताब्यात घेतले. मला ३-४ तास बसवून ठेवले. मी एक वर्षापासून मुख्यमंत्र्यांना वेळ मागतेय. नाण्याच्या दोन बाजू असतात. त्या त्यांनी ऐकायला हव्यात. केवळ एकच बाजू ऐकून ते तसे वागत आहेत. मुख्यमंत्र्यांनी पाठराखण करू नये. आम्हाला १ रुपयाही जास्त नको, आम्हाला आमचा हक्क हवाय. आम्ही हक्कासाठी लढतोय असं प्रिया फुके यांनी म्हटलं.
कोण आहेत प्रिया फुके?
प्रिया फुके या भाजपा आमदार परिणय फुके यांच्या भावाच्या पत्नी आहेत. त्यांच्या पतीचे २०२२ मध्ये निधन झाले. त्यानंतर संपत्तीच्या वादावरून फुके कुटुंबात वाद सुरू झाला. तू कोण आहेस असं म्हणत प्रिया फुके यांना रात्री घराबाहेर काढले. त्याशिवाय परिणय फुके यांनी सत्तेचा गैरवापर करत मला जीवे मारण्याच्याही धमक्या दिल्या असा गंभीर आरोप प्रिया फुके यांनी केला होता. अलीकडेच त्यांनी २ मुलांना घेऊन विधान भवनाबाहेर आंदोलन केले. मात्र पोलिसांनी त्यांच्या मुलांसह प्रिया फुके यांना ताब्यात घेतले होते.