Pawar's fight against Modi and NCP's MLA support to bjp in gujarat | इकडं पवारांचा मोदी सरकारविरुद्ध लढा अन् तिकडं राष्ट्रवादीच्या आमदाराची भाजपला रसद

इकडं पवारांचा मोदी सरकारविरुद्ध लढा अन् तिकडं राष्ट्रवादीच्या आमदाराची भाजपला रसद

मुंबई - भारतीय जनता पक्षाविरुद्ध निकराची लढाई देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्रात सत्ता खेचून आणली. देशात नरेंद्र मोदींच्या सत्तेला शह देणे शक्य असल्याचे पवारांनी दाखवून दिले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार राज्यसभेसाठी भाजपला रसद पुरवत आहे. 

मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला धक्के दिल्यानंतर भाजपने गुजरातमध्येही काँग्रेसला धक्का देण्याचा इरादा केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यसभेसाठी गुजरातमधून एक उमेदवार शिल्लक देण्यात आला आहे. यासाठी गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कांधल जडेजा यांनी भाजपला पाठिंबा दर्शविला आहे. 

गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी 26 मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने तीन उमेदवार उभे केले आहेत. तर काँग्रेसने दोघांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक होणार निश्चित आहे. आधीच काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे उमेदवारी दिलेल्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्याचे खडतर आव्हान काँग्रेससमोर आहे. 

दरम्यान राष्ट्रवादी आमदार जडेजा यांनी भाजपला पाठिंबा देऊन मतदार संघातील विकास कामांचा हवाला दिला आहे. गुजरात सरकारच्या मदतीने मतदार संघाचा विकास करणे शक्य होईल, असं त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात शरद पवार यांच्यासह संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष भाजपविरुद्ध एकवटलेला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजपला पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय आमदार जडेजा यांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जावून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pawar's fight against Modi and NCP's MLA support to bjp in gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.