'Pawar' connections in the Lok Sabha elections - Five candidates belonging to the family | लोकसभा निवडणुकीत ‘ पवार’ कनेक्शन - कुटुंबाशी संबंधित पाच जणांची उमेदवारी
लोकसभा निवडणुकीत ‘ पवार’ कनेक्शन - कुटुंबाशी संबंधित पाच जणांची उमेदवारी

पुणे : एकाच कुटुंबातील तीन उमेदवार नको म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली. मात्र, तरीही पवार कुटुंबांशी संबंधित पाच जण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील तीन जण राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून आहेत तर दोघे जण शिवसेना- भारतीय जनता पक्ष युतीकडून लढत आहेत. 
बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या कांचन कुल या पवार कुटुंबियांच्याच जवळच्या नात्यातील आहेत.  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या त्यांच्या आत्या आहेत. कांचन यांचे वडील कुमारराजे निंबाळकर हे सुनेत्रा पवार यांचे चुलत बंधु आहेत. 
मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उस्मानाबाद मतदारसंघातून पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह निवडणूक लढवित आहेत. पद्मसिंह पाटील हे सुनेत्रा पवार यांचे सख्खे बंधू आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून लढत असलेले ओमराजे निंबाळकर हे पदमसिंह पाटील यांचे चुलत बंधू पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे त्यांचेही पवार कुटुंबियांशी नाते आहे. 

भारतीय जनता पक्षामध्येही नातेगोते 
भारतीय जनता पक्षामध्येही नात्यागोत्याचे राजकारण आहे. पुण्यातून लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचे जावई रोहन देशमुख हे माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. ते सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव आहेत. पुण्यातून माघार घेताना संजय काकडे यांनी रोहन यांच्यासाठी शब्द टाकल्याची चर्चा आहे. 
             


Web Title: 'Pawar' connections in the Lok Sabha elections - Five candidates belonging to the family
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.