पार्थ पवार यांच्या कंपनीला व्यवहार रद्द करण्यासाठी ४२ कोटी भरावेच लागणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळे संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 10:00 IST2025-11-13T10:00:22+5:302025-11-13T10:00:33+5:30
Parth Pawar News: मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राईजेस एलएलपी कंपनीने मुद्रांक शुल्क बुडविल्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने त्यांना मूळ दस्त अधिकृत करण्यासाठी २१ कोटी व हा दस्त रद्द करण्यासाठी आणखी २१ कोटी अशा ४२ कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे.

पार्थ पवार यांच्या कंपनीला व्यवहार रद्द करण्यासाठी ४२ कोटी भरावेच लागणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळे संभ्रम
पुणे - मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राईजेस एलएलपी कंपनीने मुद्रांक शुल्क बुडविल्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने त्यांना मूळ दस्त अधिकृत करण्यासाठी २१ कोटी व हा दस्त रद्द करण्यासाठी आणखी २१ कोटी अशा ४२ कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे.
महाराष्ट्र मुद्रांक कायद्यानुसार ही नोटीस बजावण्यात आली असून या विभागाचे मंत्री अर्थात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच शंकास्पद विधान करीत या नोटिशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, दस्त रद्द करायचा असेल तर ४२ कोटी रुपयांचे शुल्क भरावेच लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, बावनकुळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने विभागामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
४२ कोटी भरण्याची नोटीस
मुळात ही सरकारी जमीन असताना तेजवानी यांनी ती अमेडिया कंपनीला विकली. जमिनीची किंमत ३०० कोटी रुपये दर्शवून पाचशे रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर व्यवहार पूर्ण करण्यात आला. यानंतर अजित पवार यांनी व्यवहार रद्द करत असल्याचे स्पष्ट केले. व्यवहार रद्द करण्यासाठी पहिला दस्त अधिकृत करण्यासाठी २१ कोटी आणि तो रद्द करण्यासाठी आणखी २१ कोटी भरा, अशी नोटीस दिली.
त्यानंतरही खुद्द महसूलमंत्री, या जागेचा व्यवहार रद्द होत असताना पुन्हा ४२ कोटी रुपयांची नोटीस का बजावली, असा प्रश्न उपस्थित करत असल्यास त्यांना काय सुचवायचे आहे. अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्कातून सूट द्यायची आहे का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले आहे.
अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असल्याने आणि चौकशी समितीतील सहा पैकी पाच सदस्य पुण्यातीलच असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकणार नाही. त्यामुळे अजित पवार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, पवार पिता-पुत्रांच्या सर्व जमीन व्यवहार मी मालिका स्वरूपात उघड करणार आहे.
- अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या