"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:26 IST2025-11-10T12:02:29+5:302025-11-10T12:26:18+5:30
पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणावरुन शिंदे गटाने गंभीर आरोप केला आहे.

"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
Mahendra Dalvi on Parth Pawar: उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे पुत्र पार्थ पवार यांच्या कोरगाव पार्कमधील जमीन खरेदी व्यवहारामुळे वादात अडकलेले आहेत. अशातच महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात खळबळजनक दावा केला आहे. पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहारावर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच एक बाप मुलासाठी किती खोटं बोलतोय हे आपण बघितलं' अशा बोचऱ्या शब्दांत अजित पवारांवर निशाणा साधला.
पुण्याच्या जमीन खरेदी व्यवहारावरुन बोलताना शिवसेना शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी गौप्यस्फोट केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण कसं बाहेर आलं असा सवाल त्यांनी केला. तसेच राष्ट्रवादीच्या लोकांनीच पार्थ पवार यांचा घात केल्याचा आरोप महेंद्र दळवींनी केला. यामुळे आता रायगडमधील राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. रायगडमधील एका कार्यक्रमात बोलताना महेंद्र दळवी यांनी हा आरोप केला.
"एक बाप मुलासाठी किती खोटं बोलू शकतो हे आपण बघितलं. या गोष्टी राष्ट्रवादीला काही नवीन नाहीत. याच कोलाड नाक्यावरचा आपण ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार बघितला आहे. मुंडे साहेबांनी कोणाची सुपारी, कशी दिली हे चित्र आपण बघितलं. अनेकजण चर्चा करतात की निवडणुकीच्या आधी हे प्रकरण कसे बाहेर आले. माझा संशय वेगळा आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच त्यांचा घात केला असं माझं म्हणणं आहे," असं महेंद्र दळवी म्हणाले.
या निवडणुकीमध्ये हिशोब चुकता नक्की करणार
"राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राला लुटलाय, ओरबाडून खाल्लाय. तटकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ते बालिश बुद्धी सारखे बोलत आहेत. तटकरे फॅमिलीने प्रत्येकाचा घात केला आहे. मला तीन वेळा फसवलं आहे. भरत शेठ यांना दोन वेळा फसवलं आहे. कर्जत मध्ये आमदार महेंद्र थोरवे यांना अडचणीत आणण्यासाठी महायुती सोडून उबाठासोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. तटकरे साहेब किती खोटं बोलतात, हे महाराष्ट्राला माहिती आहे. या निवडणुकीमध्ये आम्ही हिशोब चुकता नक्की करणार. जे काय करायचं असेल तर याच निवडणुकीमध्ये आपणास हिशोब चुकता करायचा आहे. आम्ही तिघेही मातब्बर आहोत. आमच्या मागे शिंदे सरकारचा आशिर्वाद आहे. निवडणुकीला सामोरे जात असताना रोह्याची जनता बदल निश्चित घडवून आणेल," असेही महेंद्र दळवी म्हणाले.