गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 07:16 IST2025-12-26T06:14:01+5:302025-12-26T07:16:23+5:30
मुदखेड तालुक्यातील जवळामुरार येथे गुरुवारी सकाळी ही भीषण घटना उघडकीस आली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. एका आत्मघाती निर्णयाने संपूर्ण कुटुंबच संपून गेले.

गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
- नामदेव बिचेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
बारड (नांदेड) : गुरुवार २५ डिसेंबरची पहाट मुदखेड तालुकाच नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्याला हादरवणारी ठरली. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्मघात केला. आई-वडील घरात फासावर लटकले, तर कुटुंबातील दोन तरण्याबांड पोरांनी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली.
या थरारक घटनेमागे पोलिस प्रथमदर्शनी आर्थिक संकट आणि कुटुंब प्रमुख वडिलांचा आजाराशी २५ वर्षांपासूनचा संघर्ष हे कारण सांगत आहेत. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच खरे काय ते स्पष्ट होईल. आई-वडील स्वत:हून फासावर लटकले की मुलांनी आधी त्यांना फासावर लटकवून नंतर स्वत:ही जीवनयात्रा संपविली, यावर पोलिस तपासाचा फोकस आहे. या घटनेमागे घातपात तर नाही ना, अशी शंकाही पोलिसांकडून तपासून पाहिली जात आहे.
मुदखेड तालुक्यातील जवळामुरार येथे गुरुवारी सकाळी ही भीषण घटना उघडकीस आली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. एका आत्मघाती निर्णयाने संपूर्ण कुटुंबच संपून गेले.
मुलांचे मृतदेह पाहताच गावकरी धावले घराकडे
बजरंग लखे (२२) आणि उमेश लखे (२६) या मुलांचे मृतदेह मुगट रेल्वे स्थानक
क्षेत्रात ट्रॅकवर कटलेल्या अवस्थेत आढळले. त्यांची ओळख पटल्यानंतर गावातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. घरात रमेश होनाजी लखे (५२) आणि
त्यांची पत्नी राधाबाई रमेश लखे (४८) हे आई-वडील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले.
वडिलांचा दीर्घ आजार, त्यातून बिघडलेली आर्थिक स्थिती, गरीब परिस्थिती ही कारणे प्रथमदर्शनी या घटनेमागे पुढे आली आहेत. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल. विविध अंगांनी या घटनेचा तपास करीत आहोत. आत्महत्या की घातपात या जनतेतील शंकेच्या दिशेनेही तपास केला जात आहे.
अबिनाश कुमार,
जिल्हा पोलिस अधीक्षक, नांदेड
जवळामुरार गावात एका छोट्या मातीच्या घरात लखे कुटुंब वास्तव्याला होते. रमेश लखे २५ वर्षांपासून हृदयाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर बायपास सर्जरी झाली आहे. त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्याही कमकुवत झाले होते. परिवाराने आपली चार एकर शेती मक्ता बटाईने लावून दिली होती. राधाबाई लखे या शेतमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. बजरंग हा दुकानात तर उमेश मंडप डेकोरेशनचे काम करायचा.