परबांनी सरकारचा ७०० कोटींचा कर बुडवला; शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 09:10 IST2025-10-06T09:09:58+5:302025-10-06T09:10:17+5:30
कदम यांनी परब यांच्यावर पुन्हा टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, परब यांनी ८ हजार मराठी माणसांची फसवणूक केली, असा आरोप केला आहे.

परबांनी सरकारचा ७०० कोटींचा कर बुडवला; शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आ. अनिल परब यांची नार्को टेस्ट करावी. त्यांनी शासनाचा ७०० कोटीचा कर बुडवला आहे. केवळ उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी ते आरोप करत आहेत, असे शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
कदम यांनी परब यांच्यावर पुन्हा टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, परब यांनी ८ हजार मराठी माणसांची फसवणूक केली. विलेपार्ले येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू आहे. ती अद्याप पूर्ण झाली नाही. माझ्याकडे रहिवाशांनी प्रतिज्ञापत्र दिले. यात ८ हजार लोकांना फक्त एक वर्षाचे भाडे दिले. ही मराठी कुटुंब ९ वर्षांपासून मुंबईबाहेर आहेत. परब यांनी बिल्डरकडून कोट्यवधी रुपये, दोन मर्सिडीज घेतल्या. हे माझे म्हणणे नाही तर रहिवाशांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले असल्याचा आरोप त्यांनी केला.
परब यांनी कदम यांच्यावर डान्सबारबाबतही आरोप केले होते. त्याबाबत कदम यांनी सांगितले की, तो डान्सबार नाही तर फक्त ऑर्केस्ट्रा होता. केवळ कदम कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी ते बोलले. मी न्यायालयात जाणार आहे. परब यांनी कोट्यवधींचा शासनाचा महसूल बुडवला. केबलच्या बोगस कंपन्यांकडून नुकसान झाल्याचे दाखवून ते हा उद्योग करत आहेत.
पनवेल ते राजापूर केबल टाकली. पण, एक पैसा शासनाला दिला नाही. यात ७०० कोटीचे शासनाचे नुकसान केले. ही सगळी माहिती मी राज्य शासनाला देणार आहे. आपल्या पुतण्याने आत्महत्या केली नाही. ती घटना रस्ते अपघात होती, असेही ते म्हणाले.
करा चौकशी : परब
रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांबाबत आ.परब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, सरकारने चौकशी करावी. सरकार तुमचे आहे तर करा चौकशी.
राजकारणासाठी कुटुंबाचा वापर नको : ज्योती कदम
रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम या प्रथमच माध्यमांसमोर आल्या. परब यांनी जाळून घेण्याच्या मुद्द्यावर त्यांनी खुलासा केला. परब यांनी केलेले आरोप खोटे असून राजकारणासाठी कुटुंबाचा वापर करू नये, खूप त्रास होतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केली.