वसईत मंगळवारी रात्री एका निवासी इमारतीचा भाग कोसळल्याची दुर्घटना घडली, यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, नऊ जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
एएनआय वृत्त संस्थेने वसई- विरार पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, वसईतील नारंगी रोडवरील चामुंडा नगर आणि विजय नगरदरम्यान असलेल्या रमाबाई अपार्टमेंटच्या चार मजली इमारतीचा मागील भाग काल रात्री उशिरा कोसळला. या घटनेची माहिती मिळताच वसई विरार महानगरपालिका अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफच्या दोन पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.
दरम्यान, आतापर्यंत ११ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर जखमींवर विरारमधील जवळच्या रुग्णालयात दाखल उपचार सुरू आहेत. दरम्यान, एनडीआरएफ, अग्निशमन दलाची टीम तसेच स्थानिक पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून बचावकार्य सुरू आहे.