आपलं सरकार मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल; उद्धव ठाकरेंची पंकजाताईंना ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 06:33 PM2019-12-02T18:33:53+5:302019-12-02T18:42:35+5:30

राज्यातील राजकीय पेच आता संपुष्टात आला असून, उद्धव ठाकरे सरकार सत्तेवर आलेलं आहे.

Our Government will create a Maharashtra that is intended for Munde Saheb; Uddhav Thackeray to Pankaja mundhe | आपलं सरकार मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल; उद्धव ठाकरेंची पंकजाताईंना ग्वाही

आपलं सरकार मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल; उद्धव ठाकरेंची पंकजाताईंना ग्वाही

googlenewsNext

मुंबईः राज्यातील राजकीय पेच आता संपुष्टात आला असून, उद्धव ठाकरे सरकार सत्तेवर आलेलं आहे. तर भाजपाला विरोधात बसावं लागलं आहे, विशेष म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनीही त्यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली होती. उद्धव ठाकरेंना ट्विटरच्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी शुभेच्छा देत आदरणीय व प्रिय उद्धवजी यांना मनःस्वी शुभकामना!!

एका ठाकरेंनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले. हार्दिक अभिनंदन!! महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे, 'राज्याचे हित प्रथम '!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा, असं पंकजाताई ट्विट करत म्हणाल्या होत्या, त्यावर आता उद्धव ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी ट्विटरच्याच माध्यमातून शुभेच्छांचा स्वीकार करत पंकजा मुंडेंचे आभार व्यक्त केले आहेत. आपले मनःपूर्वक धन्यवाद पंकजाताई मुंडे! 'राज्याचे हित प्रथम' याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल, असा विश्वास मी तुम्हाला देतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे भाजपामध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

 राज्यातील सत्ता हातची गेल्यानंतर भाजपामधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला होता. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंसह अनेक वरिष्ठ नेत्यांची तिकिटं कापण्यात आली होती. पंकजा मुंडेंना बीडच्या परळीमधून उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.

या पराभवानंतर त्या सक्रिय राजकारणापासून काहीशा दूर गेल्या आहेत. त्यांनी ट्विटरवरून भाजपा नावाचा उल्लेखदेखील काढून टाकला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपा सोडणार अशीही चर्चा सुरू आहे. सध्या पंकजा मुंडे आणि बहुजन समाजातील काही लोकप्रतिनिधी यांच्यात एक वेगळा गट तयार करण्यावर एकमत झालं आहे असल्याची माहिती मिळाली होती, तर दुसरीकडे पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं, आता पंकजाताईंच्या ट्विटला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिल्यानं पुन्हा एकदा पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार का?, या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

Web Title: Our Government will create a Maharashtra that is intended for Munde Saheb; Uddhav Thackeray to Pankaja mundhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.