भोंदूबाबा खरातच्या संस्थानचा पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश; मिळत होते दररोज ३९ लाख लिटर पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 08:25 IST2026-03-22T08:25:22+5:302026-03-22T08:25:22+5:30
थेट , पिण्याच्या पाण्यावर फुलवली बाग, खरातच्या आर्थिक व्यवहाराची आयकर खात्याकडून होणार चौकशी

भोंदूबाबा खरातच्या संस्थानचा पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश; मिळत होते दररोज ३९ लाख लिटर पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर/अहिल्यानगर/नाशिक: नाशिक येथील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या मिरगाव (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील श्री शिवनिका संस्थानला मराठवाड्याच्या हक्काचे ३९ लाख लिटर पाणी देण्यात आल्याचे वृत्त ‘ लोकमत’ने २१ मार्च रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत खरात संस्थानचा पाणीपुरवठा बंद करणार असल्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. शिवाय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून खरातच्या संस्थेला पाणी देण्याची फाइल मागविण्यात आली आहे.
भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याने राजकीय वजन वापरून त्याच्या मिरगाव येथील संस्थेला ३९ लाख लिटर पाणी पाणी मिळवून घेतल्याची बाब उघडकीस आली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने त्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचे हक्क कशाच्या आधारे देण्यात आले, याची तपासणी सुरू केली आहेे. शिवाय त्याने आजपर्यंत पाणीपट्टी भरली का, पिण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाण्याचा अन्य कारणासाठी वापर करीत आहे का, याचीही पडताळणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
खरातच्या व्यवहारांची इन्कम टॅक्सकडून संयुक्त तपासणी
भोंदू खरात प्रकरणात विशेष तपास पथक चौकशी करत असतानाच आता आयकर विभागही या प्रकरणात लक्ष घालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खरातच्या नावावर असलेल्या मालमत्ता, त्याचे उत्पन्नाचे स्त्रोत आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची तयारी सुरू झाल्याचे समजते. त्यातच मोठ्या रकमेचे व्यवहार असतील तर सर्वांच्या विवरणपत्रांची संयुक्त तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात फक्त खरातच नव्हे, तर ज्यांनी त्याला पैसे पुरवले, भागीदारी केली त्या व्यक्तींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
अशी असेल भोंदूबाबा खरात प्रकरणाच्या तपासाची दिशा
नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विशेष पोलिस पथक आता वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहे. प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याने तपास वेगवेगळ्या दिशेने पुढे जाणार आहे.
आणखी पीडित महिलांचा शोध घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन तक्रार करण्यास सांगणे. त्यानुसार केसची फाइल मजबूत करणे.
खरात याच्या मोबाइलमधील सीडीआर फाइल तपासून आणखी माहिती घेणे. त्या आधारे संपर्कातील प्रमुख नेते, अधिकारी व अन्य प्रभावी व्यक्तींची चौकशी करणे.
खरात याला मदत करणाऱ्यांचा शोध घेणे, त्यांचा या लैंगिक कांडांशी संबंध तपासणे. खरात याच्या मालमत्तांचा शोध घेऊन, त्याचे भागीदार शोधणे. तसेच मालमत्ता गोठवण्याची प्रक्रिया पुढे नेणे. खरात याच्याकडे इतकी मालमत्ता कुठून कशी आली याचा शोध घेणे. त्याची आणि त्याला आर्थिक मदत करणाऱ्यांची नाकेबंदी करणे.
एपस्टीनचा कोठडीत मृत्यू; खरातचे काय?
महाराष्ट्राचा एपस्टीन म्हणून खरातला संबोधले जाते. अनेक हायप्रोफाइल लोक त्याच्याकडे येत होते. त्यांची नावे समोर येऊ नयेत यासाठी त्याच्या जीवाला धोका पोहचू शकतो. एपस्टीनप्रमाणे त्यालाही मारले जाऊ शकते. त्याच्याकडे येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची नावे समोर येत नाहीत तोपर्यंत त्याला सुखरूप ठेवावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे (शरद पवार ) प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी मुख्यमंत्री तसेच पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
चाकणकरांवरील प्रश्नावर तटकरेंची चिडचिड का?; अंजली दमानियांचा सवाल
नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणावरून अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे. रूपाली चाकणकरांच्या भोंदूबाबा बरोबरच्या फोटो आणि व्हिडिओवरून प्रश्न विचारताच तटकरे चिडचिड करत टाळाटाळ का करतात, असा सवाल दमानिया यांनी केला आहे.
पत्रकारांनी तटकरे यांना चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला. मात्र त्यांनी मोजक्याच शब्दांत उत्तर देत अधिक बोलण्याचे टाळले. यावेळी ते काहीसे संतापलेले दिसले. यावर दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून तटकरेंना थेट सवाल केला.
चाकणकरांबद्दल प्रश्न विचारताच सुनील तटकरे यांनी पळ का काढला? काय लपवायचे आहे? आज तुमची ‘त त प प’ स्पष्ट दिसली, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. हे प्रकरण इथे थांबणार नसून संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
महिला नेत्यांचा हल्लाबोल
भोंदूबाबा अशोक खरात भोवती निर्माण झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला नेत्या उघडपणे मैदानात उतरल्या आहेत. रूपाली चाकणकर यांच्या महिला आयोगाच्या राजीनाम्यानंतरही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.
रूपाली चाकणकर यांनी ५०० ते ६०० कोटींची माया जमवली. तटकरे यांची साथ आहे, तोपर्यंत आपले कोणीच काही करू शकत नाही. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाईचाच बडगा उगारला. तरीही त्या पत्रकारांसमोर ‘गिरे तो भी नाक उपर’ थाटात बोलत होत्या.- सुषमा अंधारे, नेत्या, उद्धवसेना
खरात यांच्याकडे बड्या नेत्यांची माहिती असल्याने खरातचा एन्कांऊंटर सुद्धा होऊ शकतो. - तृप्ती देसाई, सामाजिक कार्यकर्ती
या प्रकरणात रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घेऊन भागणार नाही. यात जे कोणी सहभागी असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी. - रोहिणी खडसे, महिला प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार)
चाकणकर यांच्यावरील आरोप आणि व्हिडिओत दिसत असलेल्या पुराव्यांमुळे त्यांचा राजीनामाच पुरेसा नाही तर त्यांना अटक होण्याची गरज आहे. - रूपाली ठोंबरे, नेत्या, राष्ट्रवादी (अजित पवार)
राजीनामा दिल्याचे प्रसारमाध्यमांसमोर चाकणकर या खोटेच सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला आहे.- करुणा मुंडे