CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:15 IST2025-10-01T18:14:40+5:302025-10-01T18:15:38+5:30
Maharashtra Rain Flood News: सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत असते. पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
Maharashtra Rain Flood News: राज्यातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्तांना येत्या आठ दिवसांत सर्वसमावेशक मदत जाहीर केली जाईल आणि मदतीची रक्कम दिवाळीच्या आत बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात सुमारे ६० लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दुसरीकडे ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत तातडीने द्यावी, अशी मागणी विरोधकांनी सातत्याने लावून धरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत तसेच जुने पत्र दाखवत विरोधकांनी टीका केली आहे.
सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत असते. पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यानंतर आता विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करताना दिसत आहेत.
यात नाहक बळी जाईल तो सामान्य माणसाचा, याचा गांभीर्याने विचार करा!
ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. त्याबद्दल काही दुमत नाही, असे देवेंद्र फडणवीस एका व्हिडिओत बोलताना पाहायला मिळत आहे. हा जुना व्हिडिओ ०१ ऑक्टोबर २०२१ असल्याचा दावा केला गेला आहे. तसेच मुख्यमंत्री महोदय असलं राजकारण बरं नव्हं…! यात नाहक बळी जाईल तो सामान्य माणसाचा, याचा गांभीर्याने विचार करा!, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जुन्या पत्राचा दाखला दिला आहे.
मुख्यमंत्री महोदय असलं राजकारण बरं नव्हं…! यात नाहक बळी जाईल तो सामान्य माणसाचा, याचा गांभीर्याने विचार करा!@Dev_Fadnavispic.twitter.com/DLygZfyaLZ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 1, 2025
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये
तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १६ ऑक्टोबर २०२० मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत पत्र लिहिले होते. आज त्यापेक्षा दहा पटीने गंभीर परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे,म्हणून आम्ही जेव्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतो, तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस सांगतात ओला दुष्काळ ही संकल्पना नाही, नियमावलीत असा शब्द नाही, ओला दुष्काळ कधीच जाहीर केलेला नाही! मग प्रश्न असा आहे की, विरोधी पक्षनेते असताना ओला दुष्काळ ही संकल्पना होती, आणि सत्तेत आल्यानंतर ती संकल्पना नष्ट होते का? शब्दांचा खेळ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. आज शेतकरी संकटात आहे. त्याला निकषांपुढे जाऊन, सरसकट व भरीव मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १६ ऑक्टोबर २०२० मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यात #ओला_दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत पत्र लिहिले होते.
आज त्यापेक्षा दहा पटीने गंभीर परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे,म्हणून आम्ही जेव्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची… pic.twitter.com/EJOAxnVAEl— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 1, 2025