खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली विकसित, सार्वजनिक बांधकाम खात्याचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 05:41 IST2025-03-30T05:40:17+5:302025-03-30T05:41:31+5:30
Maharashtra News: पावसाळ्यानंतर रस्त्यांवर खड्डे पडतात. असे खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता खड्ड्यांबाबतची तक्रार ऑनलाइन करता येणार आहे.

खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली विकसित, सार्वजनिक बांधकाम खात्याचा पुढाकार
मुंबई - पावसाळ्यानंतर रस्त्यांवर खड्डे पडतात. असे खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता खड्ड्यांबाबतची तक्रार ऑनलाइन करता येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचे संगणकीकरण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासोबतच खड्ड्यांसाठी तक्रार प्रणाली विकसित केली आहे.
अशी दाखल करा तक्रार
नागरिक या प्रणालीच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. प्रथम PCRS ॲप प्ले स्टोअर, केंद्र शासनाच्या m-Seva portal, किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करावे.
मोबाईल क्रमांक व ओटीपी वापरून ॲप नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी ‘रजिस्टर फीडबॅक’ येथे क्लिक करावे. मोबाईल स्क्रीनवर नकाशा दिसेल. त्यामध्ये आपले लोकेशन निश्चित करून खड्ड्यांचा फोटो अपलोड करावा. खड्ड्यांचा फोटो घेऊन सदर तक्रारीबाबत अभिप्राय नोंदवावा आणि शेवटी तक्रार दाखल करावी.
या प्रणालीमध्ये तक्रारीची सद्यस्थिती दाखवण्याची व्यवस्था आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी तातडीने संबंधित शाखा अभियंता आणि उपअभियंता यांच्याकडे पाठविण्यात येतील. या माध्यमातून खड्डेमुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने सार्वजनिक बांधकाम विभागाने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.